पंढरपूर – आषाढी यात्रा सोहळा अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे वाखरी-पंढरपूर या प्रमुख पालखी मार्गाचे काम आषाढीपूर्वी पूर्ण होणार नाही हे माहीत असूनही ठिकठिकाणी खोदकाम करून काम सुरू असल्याचा नवा प्रतापच प्रशासनाकडून सुरू आहे. याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे पंढरपूर दौऱ्यावर आषाढी वारीनिमित्त पालखी मार्गाची आणि वारकऱ्यांच्या सुविधा आणि समस्या जाणून घेणार आहेत.वाखरी-पंढरपूर या पालखी मार्गाचे काम गेल्या तीन वर्षापासून संथगतीने सुरू आहे. या महामार्गाचे काम भोपाळ (मध्य प्रदेश) येथील ठेकेदाराला देण्यात आले आहे. या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा फटका गेल्या तीन वर्षात स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना बसला आहे. त्याच्या विरोधात वारंवार तक्रारी करूनही प्रशासन कसलीच कारवाई करीत नसल्याने तक्रार करायची कुणाकडे? हा प्रश्न सध्या नागरिकांना पडला आहे. मागील वर्षभर संथगतीने सुरू होते. मात्र, पालखी सोहळ्याचे वेध लागताच मागील एक महिन्यापासून काम पूर्ण होणार नसल्याचे माहीत आसताना वाखरी ओढा, इसबावी मलपे पूल उकरून त्याचे काम संथगतीने सुरू आहे.
वाखरी आणि मलपे ओढ्यावरील पुलाचे वगळता इतर मार्गाचे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वारकरी, त्यांची वाहने व्यवस्थित जातील अशी व्यवस्था नक्की होईल. भाविकांनी निश्चित राहावे. केशव घोडके, प्रकल्प संचालक, पालखी
वाखरी बाह्यवळण रस्त्यावर जुन्या खड्यात मुरूम टाकून निकृष्ट काम करण्याचा ठेकेदाराचा घाट ग्रामस्थांनी हाणून पाडला आहे. त्यानंतर तो रस्ता पुन्हा उकरून नव्याने करण्यास सांगितले आहे. संग्राम गायकवाड, माजी सरपंच, वाखरी
ठेकेदाराकडे यंत्रणेचा तुटवडा..
कर्मवीर कॉलेज चौक ते सरगम चौक एक लेन अर्धवट असताना दुसरी लेन उकरण्याचा घाट ठेकेदाराने घातला आहे. त्या खड्यात आता पावसाचे पाणी साठत आहे. इसबावी बुवाचे हॉटेल ते मलपे ओढ्यापर्यंतचा रस्ता अर्धवट आहे. वाखरी बाह्यवळण व वाखरी पेट्रोल पंपाजवळील रस्ते अर्धवट अवस्थेत उकरून ठेवले असल्याचे दिसत आहे. संबंधित ठेकेदाराकडे यंत्रणेचा तुटवडा असल्याचे समजते.
आषाढी वारीनिमित्त अधिकाऱ्यांच्या बैठका
पालकमंत्री जयकुमार गोरे हे शुक्रवार, ६ जून रोजी सोलापूर दौऱ्यावर असून आषाढी वारी काळात सोलापुरात दाखल होणाऱ्या पालखींच्या स्वागतासाठी विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका पालकमंत्री घेणार आहेत. तसेच पंढरपूर परिसरातील विविध पालखी तळांची ते पाहणी करणार आहेत.
सकाळी साडेआठ वाजता शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्र्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर पावणेनऊ वाजता जिल्हा परिषद येथे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यास पालकमंत्री हजेरी लावणार आहेत. त्यानंतर पंढरपूरकडे रवाना होणार आहे. दुपारी साडेअकरा वाजता रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृहात आषाढी वारी आढावा बैठक घेणार आहेत. तसेच ६५ एकरावर देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी करणार आहेत.
३ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब मंत्री प्रकाश आबिटकर हे देखील शुक्रवारी सकाळी ११.३० वा. पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे पालखी मुक्कामस्थळी भेट देऊन पाहणी करणार होते. परंतु आठवड्याभरात दुसऱ्यांना त्यांचा सोलापूर दौरा रद्द झाला असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आले
