जम्मू-काश्मीरमधील जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब पुलाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा रेल्वे पूल जम्मू-काश्मीरच्या विकासातील एक क्षण मानला जात आहे. चिनाब नदीवर या पुलाचे बांधकाम करणे खूप अवघड होते. मात्र, हे आव्हान पूर्ण करीत भियंत्यांनी चिनाब पुलाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले. तसेच काही महिन्यांपूर्वी या पुलावरून रेल्वेची पहिली यशस्वी चाचणीही पार पडली. आज या पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी २७२ किमी लांबीच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकमधील सर्वांत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. साधारण १३१५ मीटर लांबीचा हा पूल संपूर्ण प्रकल्पातील सर्वांत कठीण आणि वेळखाऊ भाग होता. या पुलाच्या उद्घाटनानंतर जम्मू काश्मीरच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आणि फार मोठे स्वप्न साकार झाले. चिनाव पूल प्रकल्प पंतप्रधान मोदी यांच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानला जात होता. या चिनाव पुलाला रेल्वे क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणून ओळखले जाते. अभियांत्रिकी चमत्कार मानला जाणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जम्मू-काश्मीरच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. चिनाब पुलाच्या दोन्ही बाजूंना झिंकने कोट केले आहे. या बहुचर्चित पुलावरून उधमपूर-श्रीनगर वारामुल्ला रेल्वे लाईन सुरू होणार आहे. चिनाब पूल १,१७८ फूट उंचीवर आहे. तसेच आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच असून, या पुलाचे आयुष्य १२० वर्षे इतके आहे. जगातील सर्वांत उंच चिनाब पुलाच्या उद्घाटनापूर्वी स्थिरता आणि सुरक्षितत्ता तपासण्यासाठी अनेक चाचण्यादेखील करण्यात आल्या. २६० कि.मी. प्रतितास वेगाच्या वाऱ्यांना आणि अतिजास्त तापमान व भूकंपासह इतर समस्यांना तोंड देण्यास हा पूल सक्षम आहे.
चिनाब नदीवरील सर्वांत उच रेल्वे पुलाचे उद्घाटन केल्यानंतर पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई वैष्णोदेवीच्या आशीर्वादाने आज काश्मीर खोरे देशाच्या रेल्वे नेटवर्कशी जोडले गेले आहे, असे सांगतानाच पहलगाम हल्ल्याचा संदर्भ देत पाकिस्तानवर दंगली घडविण्याचा आरोप केला. जम्मू-काश्मीर भारतमातेचा मुकूट्टाहे. याच भूमीतील पहलगाममध्ये मानवता आणि काश्मिरीवर हल्ला केला. परंतु ऑपरेशन सिंदूरने त्यांना धडा शिकविला आहे. आता भारताने दहशतवादाला ठोस उत्तर देण्याचे ठरवले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
काश्मिरींसाठी वरदान
जम्मू-काश्मीरच्या लोकांसाठी चिनाब पूल वरदान ठरणार आहे. या पुलामुळे या प्रदेशात पुढे तयार होणाऱ्या प्रकल्पांसाठी प्रवास आणि मालाची वाहतूक सुलभ होईल. तसेच था प्रदेशात तैनात सशस्त्र दलासाठी रेल्वे मार्ग अधिक उपयुक्त ठरेल. तसेच पर्यटनाला चालना देण्यासही मदत होणार असल्याचे सांगण्यात आले
पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच
काश्मीर खोऱ्यात चिनाब नदीवर बांधलेला हा पूल अभियांत्रिकीचे एक अतुलनीय आणि बदलत्या भारताचे उदाहरण आहे, जो पेरिसमधील आयफेल टॉवरपेक्षाही उंच आहे. हा पूल ४० किलो स्फोटके आणि ८ रिश्टर स्केलपर्यंतच्या भूकंपाचा सामना करू शकतो
२००३ मध्ये चिनाब पुलाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. २००५ मध्ये पुलाचे बांधकाम सुरू झाले. २००९ मध्ये पुलाचे बांधकाम पूर्ण करायचे होते. परंतु ते झाले नाही तर २०१७ साली ३२०० कामगार आणि अभियंते यासाठी कामाला लागले. काम थांबू नये, म्हणून ५२ निवासी ब्लॉकमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. २०२१ मध्ये पुलाच्या कमानी बांधण्याचे काम सुरू झाले. पुलावर ट्रॅक टाकण्याचे कामही सुरू झाले. २०२४ ला गाड्यांची चाचणी पूर्ण झाली. चाचणी आणि तयारी अंतिम टप्यात पोहोचली. २०२५ ला मंजुरीच्या २२ वर्षांनंतर ६ जून रोजी पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
