रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज झालेल्या नाणेनिधी धोरण समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉईटने कमी करण्यास ६ सदस्यांनी मंजुरी दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी यासंदर्भात माहिती दिली. यामुळे आता आरबीआयला बँकांसाठी कमी व्याजदरात कर्ज द्यावे लागणार आहे. याचा फायदा कर्जदार ग्राहकांना होणार आहे. सलग तिसऱ्यांदा आरबीआयने व्याजदरात कपात केल्याने याचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारपेठेत दिसण्याची शक्यता आ हे. शेअर बाजारातही याचे सकारात्मक पडसाद उमटले. आरबीआयच्या नाणेनिधी धोरण समितीची आज बैठक पार पडली. गव्हर्नर संजय मल्होत्रा हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. एकूण ६ सदस्यांच्या बैठकीत व्याजदार ५० बेसिस पॉईटने कमी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे व्याजदर हे ६ टक्क्यांवरून थेट ५.५ टक्क्यांवर आले आहेत. यावेळी मल्होत्रा यांनी देशातील महागाईचा दर चालू आर्थिक वर्षासाठी ३.७ टक्के राहील, असे म्हटले आहे. त्यामुळे यातही ४ टक्क्यांवरून कपात झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यात आरबीआयने रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणले होते. त्याआधीच्या महिन्यात ते ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आणले होते.
गृहकर्ज होणार स्वस्त रेपो रेट म्हणजेच आरबीआयकडून देशभरातील बँकांना देण्यात येणाऱ्या निधीवर आकारण्यात येणारे व्याज आहे. या व्याजदरात कपात झाल्यास पुढे बँकांकडूनही कर्जावरील व्याजदरात कपात केली जाऊ शकते. त्यामुळे कर्जदारांना विशेषतः घर खरेदी करण्यासाठी घेतलेल्या दीर्घकालीन कर्जावरील व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. आता हे आणखी ५० बेसिस पाईंटने घटवले आहेत. त्याआधी सलग ६ महिने आरबीआयने व्याजदरात कोणताही बदल केला नव्हता. परंतु सलग तिसऱ्यांदा रेपो रेट घटविल्याने कर्जदारांना याचा फायदा होणार.
जीडीपी ६.५ टक्क्यांवर !
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत जीडीपीचाही अंदाज वर्तवला. चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा वेग ६.५ टक्के राहू शकतो, असे म्हटले. तिमाहीनुसार ही टक्केवारी एप्रिल ते जूनदरम्यान २.९ टक्के, जुलै ते सप्टेंबरदरम्यान ३.४ टक्के, ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान ३.९ टक्के तर पुढील वर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान ४.४ टक्के इतका राहू शकतो, असे सांगितले.
