पुणे – आता आळंदी-देहूमध्ये वारकऱ्यांची गर्दी वाढू लागली आ-हे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात संत शिरोमणी तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळ्याचे पंढरीसाठी प्रस्थान होणार आहे. त्यामुळे देहू-आळंदीत जोरदार तयारी सुरू झाली असून, वारकरीही देहू-आळंदीला निघण्याच्या तयारीत आहेत. पंढरपूरची वारी सर्व धर्म, जाती आणि वयोगटातील लोकांना एकत्र आणणारी, समाधान आणि शांती देणारी आहे. या पवित्र परंपरेत आधुनिक युगातील तरुणांना व नव्या पिढीला सहभागी करून घेण्यासाठी एआय दिंडी नावाची एक अभिनव संकल्पना साकारण्यात आली आहे. एआय दिंडीत व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि सुलभ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. अधिकाधिक लोकांना वारीत सहभागी करून घेणे, त्यांना आपल्या संस्कृतीची, वारकरी संप्रदायाची ओळख करून देणे आणि वारीसारख्या अद्भुत आध्यात्मिक अनुभवाची सुलभता निर्माण करणे, हा या वारीचा उद्देश आहे. कोणालाही आपल्या सोयीच्या दिवशी वारीत सहभागी होता यावे, यासाठी विशेष बस व्यवस्था असते. म्हणजे ज्या दिवशी ज्या टप्प्यावर पालखी आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी बसची व्यवस्था केली जाते. वारीत सहभागी होण्यासाठी अभंग, टाळ-मृदंग, नामजप व भजन शिकवणारी प्रशिक्षण शिबिरे, भजन संध्या आणि वारीतील खेळ पुण्यात घेतले जातात. प्रत्येक टप्प्यासाठी नाममात्र सेवाशुल्क आकारले जाते.
‘एआय दिंडी’ म्हणजेच ऑल इनक्लुसिव्ह दिंडी अर्थात कोणतेही वय, व्यवसाय, भाषा किंवा पार्श्वभूमी असो, प्रत्येकाला सामावून घेणारी ही सेवा असणार आहे.
एआय दिडी ही पारंपरिक वारी आणि आधुनिक व्यवस्थापनाचा सुंदर संगम आहे. १८ वर्षापूर्वी उदयास आलेली ही संकल्पना पूर्वी ‘आयटी दिंडी’ या नावाने ओळखली जात होती. या उपक्रमात सामील होण्याची इच्छा असणाऱ्यांना ‘मी गृहिणी आहे, निवृत्त आहे, आयटी क्षेत्रात नाही तरी सहभागी होता येईल का?’, असे प्रश्न पडत होते. त्यामुळे याची व्याप्ती वाढविण्यात आली. त्यामुळे आयटीची आता एआय दिंडी झाली.
पुणे ते पंढरपूरपर्यंत एआय दिडी
एकीकडे ‘आयटी दिंडी’ सुरूच ठेवून आता एआय दिडी म्हणजेच ऑल इन्क्लुजिव्ह दिंडी असा नवीन टप्पा सुरू करण्यात आला. आळंदी ते पुणे या टप्प्यात पूर्वीप्रमाणेच ‘आयटी दिंडी’ या नावाने व्यवस्था कार्यरत राहील, पण वारीच्या पुणे ते पंढरपूर या पुढील टप्प्यांसाठी ‘एआय दिंडी’ असणार आहे
