पंढरपूर – श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी ऑनलाईन पध्दतीने सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंदिर समिती मार्फत संकेतस्थळ विकसित केले आहे. त्याच्यावरून निशुल्क ऑनलाईन दर्शनपास वितरणास बुधवारी दि. ४ जूनपासून प्रारंभकरण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही सुविधा दिली आहे. त्या माध्यमातून भक्तांना त्यांच्या इच्छित दिवशी आणि वेळेस मंदिरात पदस्पर्शदर्शन घेता येते. परिणामी त्यांना रांगेचा त्रास जास्त होणार नाही. सण, यात्रा, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून स.7.00 ते रा.9.00 या वेळेत एकूण 6 स्लॉट निश्चित केला आहे. प्रति स्लॉट 600 प्रमाणे दैनंदिन 3600 पासेस उपलब्ध असणार आहेत. याशिवाय, जास्तीत जास्त 10 दिवस अगोदर बुकींग करता येणार आहे. पासेस शिल्लक राहिल्यास त्याच दिवशी तात्काळ बुकींग करता येईल, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.
ही निशुल्क सुविधा पंढरपूर शहर व परिसरातील महा-ई सेवा केंद्र येथे व मंदिर समिती मार्फत देखील लवकरच बुकींग केंद्र स्थापन करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न आहे. तसेच सदर संकेतस्थळावर मंदिराची माहिती, देणगी, पुजा बुकींग, भक्तनिवास बुकींग व दर्शनपास बुकींगची सोय देखील उपलब्ध आहे. या ऑनलाईन सुविधांचा भाविकांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या व मंदिर समितीच्या 02186 224466 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केले आहे.
कसे करावे बुकींग ?
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत https://www.vitthalruk-minimandir.org या संकेतस्थळाला भेट देऊन, मुख्य पृष्ठावर “Pass Booking” या लिंकवर क्लिक करा, बुकिंग फॉर्म भरा, बुकिंग तारीख निवडा, माहिती भरा, फोटो अपलोड करा, बुकिंग पूर्ण करा, पास डाउनलोड व प्रिंट करा, बुकींग तारखेच्या दिवशी मंदिर परिसरातील श्री संत तुकाराम भवन येथे 15 मिनिटे अगोदर भेट द्या व आपले ओळखपत्र (उदा. आधार कार्ड) दाखवा आणि पासची तपासणी करून, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे दर्शनासाठी प्रवेश करावा.
