पंढरपूर : गेल्या ७ ते ८ वर्षापासून सध्याची मंदिर समिती कार्यकारिणी कार्यरत आहे. मंदिर समितीचा कालावधी संपला असताना ही नवीन मंदिर समिती नियुक्त करण्यात यावी, सध्याची समिती बरखास्त करण्यात यावी, या मागणीच्या घोषणा समितीच्या बैठकीत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या.आषाढीच्या पूर्वनियोजनासाठी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी घेण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोती व अन्य सदस्य उपस्थित होते. मंदिरातील सुरक्षा रक्षकाचे टेंडर हे गेल्यावर्षी चार कोटींचे होते. तेच टेंडर चालूवर्षी पाच कोटी सत्याहत्तर लाख रुपयांना काढले आहे. बीव्हीजी कंपनीशी हातमिळवणी करून हे टेंडर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नियमावली तयार करून ते टेंडर त्यांना देण्यात आलेले आहे. बीव्हीजी कंपनीबद्दल अनेक तीर्थक्षेत्रांवर तक्रारी असून काही ठिकाणी काळ्या यादीत त्यांचे नाव आहे असे समजते. त्याचमुळे असे अनेक गैरप्रकार मंदिर समितीचे सहअध्यक्ष व सदस्य करत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे ही मंदिर समिती लवकरात लवकर बरखास्त करावी, अशी घोषणाबाजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी शिवक्रांती युवा संघटन, मनसे, शिवस्वराज्य युवा संघटना, अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना, अखिल भारतीय छाया मराठा युवा संघटना, संभाजी ब्रिगेड या संघटनानी निवेदन दिले होते.
अनेक भाविक मोफत सेवा करायला तयार आहेत
तिरुपती बालाजी व गजानन महाराज मंदिर मठ या ठिकाणी अनेक भाविक मोफत सेवा करत असतात. त्याच पद्धतीने पंढरपुरात सेवा करण्याची मागत असतात. परंतु सर्वसामान्य जनतेचा देवाचा पैसा उधळण्याचे काम मंदिर समितीकडून अशा पद्धतीचा ठेका काढून करण्यात येत असल्याचे मनसे शहराध्यक्ष संतोष कवडे यांनी सांगितले. याबाबत मंदिर समितीच्या सह अध्यक्षांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मनुष्यबळ पूर्ण करण्याबाबत आलेल्या टेंडरसंदर्भात अनेक तक्रारी आल्या आहेत. याचा मंदिर समिती विचार करून निर्णय घेईल.
