सोलापूर : गोवा विमानसेवेच्या उद्घाटन समारंभासाठी मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री सोलापुरात येणार आहेत. निमंत्रण पत्रिकेवर त्यांची नावेही आहेत, तसेच पहिल्या विमानात बसणाऱ्या पाच प्रवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोर्डिंग पास देणार आहेत. या समारंभासाठी दीड हजार मान्यवर सोलापूरकरांना आमंत्रित करण्यात आले असून, येथील व्यावसायिकांच्या वतीने पहिल्या विमानातील प्रवाशांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोमवार, ९ जूनपासून विमानसेवा सुरू होत आहे. त्याची तयारीदेखील जोरात सुरू असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्घाटन समारंभासाठी येणार आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, पमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शुभारंभ कार्यक्रमासाठी जवळपास दीड हजार सोलापूरकरांना निमंत्रण देण्यात आले आहे. विमानतळ परिसरात वॉटरप्रूप मंडप, तसेच भव्य स्टेजची उभारणी होत आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, तसेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद रात्री उशिरापर्यंत विमानतळ परिसरात थांबून होते. तयारीचा आढावा घेतला. पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, मनपाचे सारिका आकुलवार, राष्ट्रीय विमान प्राधिकरणाचे चंद्रेश वंजारा आदी उपस्थित होते.
