थोरले आणि धाकले पवार एकत्र आले तर त्यात आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही, अशा प्रतिक्रिया दोन्ही पक्षातील नेत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. असे असतानाच अजित पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आषाढी एकादशीपर्यंत वाट पाहा, असे मोठे विधान केले आहे. त्यांच्या याच विधानावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सुध्दा १० जूनपर्यंत वाट बघण्याचे म्हटल्याने राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाचे संकेत मिळाले आहे.
अजित पवार गट आणि शरद पवार गट अर्थात दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चाना सध्या चांगलीच हवा मिळालेली आहे. दोन्ही पक्षातील नेते थेट आणि उघडपणे एकत्र येण्याबाबत विधाने करताना दिसत आहेत. दोन्ही पक्षांनी एकत्र आले पाहिजे. खासदार सुप्रिया सुळे यांनी अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे कोणताही निर्णय घेण्याआधी पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेतले जाईल. सर्व प्रकारचे निर्णय हे लोकशाही पद्धतीनेच होतील, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
एकतर्फी निर्णय होणार नाही : सुळे
हा फक्त माझाच निर्णय नाही. याबाबत पक्षातर्फे निर्णय घेतला जाईल. गेल्या सहा दशकांपासून महाराष्ट्राने श-रद पवार यांच्या कामाची पद्धत पाहिलेली आहे. शरद पवार जो निर्णय घेतात किंवा जे मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होते. त्यामुळेच पक्षाचा जो काही निर्णय असेल तो पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच घेतला जाईल. कोणताही निर्णय आम्ही आतापर्यंत एकाधिकारशाहीने घेतलेला नाही. यापुढेही कोणताही एकर्तफी निर्णय होणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे
मिटकरी काय म्हणाले?
अजित पवार गटाचे आमदार तथा प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर भाष्य केलं आहे. एकत्रिकरणाचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाही. पण पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी-एकादशीपर्यंत काहीतरी होईल, अशी अपेक्षा मिटकरी यांनी व्यक्त केली. तसेच येणाऱ्या १० जून रोजी पुण्यात पक्षाचा मेळावा होणार आहे. त्यामुळे १० तारखेपर्यंत सर्वांना वाट पाहावी, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.
मिटकरींनी जपून वक्तव्य करावे : तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांना अलीकडेच प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या ‘पांडुरंगाच्या इच्छेने एकत्र येऊ’ या विधानामुळे गती मिळाली होती. पण हे विधान पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून फारसे पचनी न पडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान सुनील तटकरे यांनी पुढे बोलताना म्हटले की, अमोल मिटकरींना सल्ला आहे की त्यांनी वक्तव्य जपून करावे. ते पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्यामुळे पक्षाची भूमिका एकदा मांडल्यानंतर पुन्हा त्यावर बोलण्याची गरज नाही, असे तटकरे यांनी ठणकावून सांगितले
