अमरावती – आमची अन्त्ययात्रा निघाली तरी चालेल. पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार बच्चू कडू यांनी केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू बेमुदत अन्नत्याग करणार आहेत. मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीजवळ रविवार दि. ८ जूनपासून या आंदोलनाची सुरुवात होईल. अमरावतीमधील संत गाडगेबाबा मंदिरापासून ते तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील समाधीपर्यंत बाईक रॅली काढणार आहे. या रॅलीत २० हजार शेतकरी सहभागी होणार आहेत. आंदोलनापूर्वी बोलताना कडू म्हणाले, ‘आमची अन्त्ययात्रा निघाली तरी चालेल. पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नसल्याचे ते म्हणाले.
