देहु/आळंदी – आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांचा व संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा श्रीक्षेत्र देहू व श्रीक्षेत्र आळंदीतून पंढरीकडे मार्गस्थ होण्यास अवघे ९-१० दिवस उरले असताना, पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांची व विविध दिंड्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पायी वाटचालीत वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठीचे तंबू खरेदी व दुरुस्ती पूर्ण झाली आहे. भजनासाठी आवश्यक असणाऱ्या पखवाजांसह इतर भजन साहित्य दुरुस्ती, खरेदी व इतर कामांची लगबग दिसून येत आहे. दिंड्यांच्या तयारीबाबत मुळ शी तालुका वारकरी दिंडी सोहळा संस्था दिंडी क्र.३३ चे सचिव हभप सुदाम भेगडे, पवन मावळ दिंडीचे सचिव हभप उत्तम बोडके, श्रीक्षेत्र घोरवडेश्वर प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष हभप मुकुंद महाराज राऊत, वैकुंठवासी हभप महादेवबुवा काळोखे मुकादम प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष हभप संतोष महाराज काळोखे, श्रीनाथसाहेब प्रासा-ि दक दिंडीचे अध्यक्ष हभप माऊली नाणेकर आदी पदाधिकाऱ्यांनी पायी वारी नियोजनाबाबत माहिती दिली. आषाढी पायी वारीसाठी दिंड्याकडे असणारे सर्व पखवाज दुरुस्तीसह शाई भरणे, ओढ काढणे, पान बदलणे आदी कामे आळंदी व देहूतील संबंधित निष्णात कारागिरांकडून केली असून, गरजेनुसार भजन साहित्याची नव्याने खरेदी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. टाळ, वीणा आदी भजन साहित्य दुरुस्त केले आहे. वाटचालीत न मिळणारे काही साहित्य तसेच किराणा खरेदी आदी कामे सुरू झाली आहेत.
२७ जूनपासून २४ तास दर्शन
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने श्री विठ्ठल रखुमाईचे २७ जूनपासून २४ तास दर्शन सुरू राहणार आहे. तसेच गेली अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले टोकन दर्शन व्यवस्थेची चाचणी १५ जून रोजी घेण्यात येणार आहे. यातील काही सुधारणा व आवश्यक तो बदल करून सुरू ठेवणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. दरम्यान, आषाढी यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे एकादशी ६ जुलै रोजी आहे
यावर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागामार्फत ६० कोटींची तरतूद केली आहे. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पालखी मार्गावर ठिकठिकाणी निवारा शेड उभारल्या जातील. तसेच नीरा पालखी तळाच्या कॉक्रिटीकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी तत्काळ देत असून, तातडीने हे काम पूर्ण करण्याच्या सूचना पुणे जिल्हा परिषदेला दिल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
