तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरात महाराष्ट्रासह कर्नाटका, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि इतर राज्यांतून दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे मंदिर प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांना मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. मंदिर संस्थानने दि. ७ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, श्री तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी मास्क परिधान करणे, सॅनिटायझर वापरणे आणि सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. श्री तुळजाभवानी देवस्थान विश्वस्त संस्था, तुळजापूर यांनी केलेल्या या आवाहनाची भाविक, पुरोहित वर्ग तसेच नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाने केले आहे.
