पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. अशातच तुळशी पूजा सुरू असल्याने भाविकांना तासन्तास थांबावे लागत होते. यामुळे आषाढी एकादशी सोहळा होईपर्यंत तुळशी पूजा बंद केल्या आहेत.मंदिर समितीकडून भाविकांना सकाळी व संध्याकाळी तुळशी पूजा उपलब्ध करून दिली जाते. विठूरायाची नित्य पूजा, तुळशी पूजा, पाद्य पूजा, चंदन उटी आदी प्रकारच्या पूजा भाविकांच्या हस्ते केल्या जातात. या पूजेमध्ये बराच वेळ जात असतो, तर पूजा सुरू असताना भाविकांना दर्शनासाठी सोडले जात नाही. यामुळे दर्शन रांग एकाच जाग्यावरच थांबते. परिणामी, लांबून आलेल्या भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत आठ ते दहा तास थांबावे लागते, तर दोन दिवसांपूर्वी अधिक वेळ दर्शन रांगेत उभे राहावे लागल्याने संतप्त झालेल्या भाविकांनी मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.
यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत शनिवारी हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी तुळशी पूजा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारपासून तुळशी पूजा बंद करण्यात आली आहे. यामुळे या निर्णयाबाबत मंदिर समितीकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
