पंढरपूर – आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात अतिक्रमण हटाव मोहीम पंढरपूर नगरपरिषद व पोलिस प्रशासनाकडून संयुक्तरीत्या चालू आहे. पहिल्या दिवशी पंढरपूर नगरपरिषदेच्या समोरील रस्त्यावर जेसीबीचा ठोका देत अतिक्रमण काढण्यात आले. पंढरपूर शहरातील स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर, पंढरपूर नगर परिषदेसमोरील रस्ता, नवीन बसस्थानक, अर्बन बँकेकडील जाणार रस्ता, भोसले चौक, सरगम चौक, इतर अनेक ठिकाणी शहरातील छोट्या, मोठ्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. नागरिकांसह भाविकांना देखील याचा अडथळा निर्माण होत आहे.
पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शनासाठी जाताना किंवा पंढरपुरातील प्रमुख मार्गावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई नगर परिषदेने सुरू केली. मंदिर परिसर महाद्वार घाट व प्रदक्षिणा मार्गावर दिंडी घेऊन जात असताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून नगर परिषदेने अर्बन बँक ते नाथ चौक, स्वा. सावरकर पुतळा ते महाद्वार, अंबाबाई पटांगण, चंद्रभागा वाळवंट व इतर रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन पोलिस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण काढण्याचे काम चालू केले आहे. प्रशासक तथा प्रांत अधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर अभियंता प्रकाश केसकर, नगर रचनाकार सोमेश धट, सुहास झिंगे, ऋषिकेश गड्डम, हनुमंत धुमाळ व अतिक्रमण विभाग पथक तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके व पोलिस कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे.
