पंढरपूर : आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात आलेल्या लाखो भाविकांना झटापट दर्शन व्हावे यासाठी कोणत्याही व्यक्तीस थेट दर्शनाचा लाभ देऊ नये असा आदेश रविवारी काढला होता, मात्र सोमवारीच व्हीआयपी दर्शनाचा लाभमिळत असल्याचे दिसून आले आहे. आषाढी यात्रेतील एकादशीला फक्त एक महिन्याचा कालावधी राहिला आहे. यामुळे गर्दीत येऊ न शकणारे भाविक अगोदरच विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत. परंतु, देवाच्या विविध पूजा व व्हीआयपी लोकांच्या दर्शनामुळे भाविकांना तासनतास ताटकळत थांबावे लागते. यामुळे रविवारी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी कोणत्याही व्यक्तीस थेट दर्शनाचा लाभ देऊ नये असे आदेश काढले आहेत. विना परवाना कोणत्याही व्यक्तीस थेट दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देता येणार नाही. अन्यथा, आपल्यावर कर्मचारी सेवा विनियम, २०२५ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आदेश मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी काढले होते.
