पंढरपूर : आषाढी यात्रेच्या अगोदर वाखरी-पंढरपूर या पालखी मार्गाच्या कामाला गती आली असल्याचा फार्स सध्या ठेकेदार, प्रशासनाकडून सुरू आहे. हे काम करत असताना मुरूम टाकून रस्ता मजबूत बनविण्याऐवजी काळी माती व मातीमिश्रीत मुरूम टाकून रस्ता बनविण्याचा प्रकार सुरू आहे. हा प्रकार गावकऱ्यांची वारंवार लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासनाकडून दोनवेळा रस्ता उकरूनही तिसऱ्यांदाही माती भरूनच यस्ताल करण्याचा घाट ठेकेदाराकडून घातला वाखरी-पंढरपूर या पालखी मार्गावर काम करत असताना संबंधित ठेकेदाराने उकरलेले काम पूर्ण करण्याऐवजी ठिकठिकाणी रस्ता उकरून ठेवल्यामुळे वारकरी, वाहनधारकांची गैरसोय होत आहे. सध्या वाखरी गावाच्या शेजारी असणाऱ्या ओढ्यावरील पुलासह दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम सुरू आहे. हा रस्ता करत असताना यापूर्वी खड्डा होता त्यामध्येच इतर ठिकाणच्या रस्त्याचे उकरलेले रॉ मटेरिअल टाकून रस्ता करण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून सुरू आहे.त्याठिकाणी खोदून त्यामध्ये मुरूम भरून एक-एक लेअर तयार करून त्याचे मजबुतीकरण करून रस्ता करणे गरजेचे असताना या सर्व नियमांना फाटा देत खड्डा भरल्यासारखा काळी माती व मुरूममीश्रित मातीने खुलेआम रस्ता बनविला जात आहे. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर दोनवेळा रस्ता उकरून त्यामध्ये मुरूम भरण्याच्या सूचना दिल्या. मात्र, तिसऱ्यांदाही ठेकेदाराने सर्वाच्या डोळ्यात धूळफेक करत मातीमीश्रित मुरूमच भरत खुलेआम रस्ता करताना दिसत होता. त्यामुळे ठेकेदार हा प्रशासनाला जुमानत नसल्याचा प्रकार समोर येत आहे. असाच प्रकार सुरू राहिला, तर रस्ता खचण्याची भीती भाविकांमधून व्यक्त केली जात आहे.
याबाबतीत ठेकेदाराला वारंवार जाब विचारूनही तो ग्रामस्थांसह प्रशासनाला जुमानत नसल्याचे चित्र आहे. याबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार आहे. संग्राम गायकवाड, माजी उपसरपंच वाखरी.
रस्ता चुकीच्या पद्धतीने होत असल्याची तक्रार आल्यानंतर त्याठिकाणी दोनवेळा भरलेला रस्ता उकरून मुरूम भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही तसाच प्रकार घडत असेल, तर पुन्हा उकरून रस्त्याचा दर्जा तपासला जाईल. रस्त्याच्या कामासाठी माती वापरली की मुरूम याची खात्री केली जाईल व मुरूमाचा थर वाढविण्याच्या सूचना देऊ. केशव घोडके, प्रकल्प संचालक, पालखी मार्ग.
