पंढरपूर – भूवैकुंठ पंढरी नगरीत आषाढी यात्रा कालावधीत होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी यंदा एआय तंत्रज्ञानाचा वापर पोलीस विभागाकडून प्रभावीपणे केला जाणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूर आणि परिसराची दहा ड्रोनद्वारे टेहाळणी केली जाणार आहे. यामुळे गर्दीवर व वाहतुकीवर नियंत्रण राहणार आहे. याचवरावर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर करून स्पीकरद्वारे वेळोवेळी भाविकांना सूचना देण्यात येणार आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे चेहरा ओळख होत असल्याने यात्रेत सामील होणारे भुरटेचोर आणि गुन्हेगारांवर पोलिसांचे लक्ष राहणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडणार नाहीत. याचबरोबर यात्रेत येणाऱ्या भाविकांची संख्या मोजता येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. पंढरपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना पोलीस अधीक्षक यांनी अपघात मुक्त वारीचा संकल्प केला. भूवैकुंठ पंढरी नगरीत मोठ्या प्रमाणावर भरणाऱ्या श्री. विठ्ठल रुक्मिणीमातेच्या आषाढी
एकादशीसाठी लाखोच्या संख्येने भाविक पंढरीत दाखल होत असतात. याचबरोबर शेकडा मैल अंतर पार करून श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह मानांच्या पालख्या अनेक दिंड्या पायी पंढरपूरला येत असतात. यात्रा काळात भाविकांना सुरक्षित आणि सुलभ दर्शन मिळावे, कुठेही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाकडून एक महिना अगोदरच तयारी केली जात आहे. यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस विभागाकडून अपघात मुक्त वारीचा संकल्पना राबवली जाणार आहे. एआय तंत्रज्ञानाव्दारे गर्दीचे प्रमाण, गर्दीची घनता मोजता येणार आहे. चेहऱ्याची ओळखीद्वारे गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवता येणार असून हरवलेली अथवा सापडलेली व्यक्ती तसेच मदतीची गरज असलेले लोकांची माहिती मिळणार आहे. आषाढी यात्रा कालावधीत गर्दीची वाढलेली घनता लक्षात येताच तत्काळ सूचना मिळेल व त्या ठिकाणी सुरक्षेबाबत उपाययोजना केली जाणार आहे.या नवीन तंत्रज्ञानाचा वापर आषाढी यात्रा कालावधीत शहरात प्रामुख्याने चंद्रभागा वाळवंट, नदीपात्र, ६५ एकर भक्ती सागर पि रसर, मंदिर परिसर, दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग, शहरातील रस्ते या भागात हजारो वारकरी-भाविकांची गर्दी होते. या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रभावीपणे केला जाणार आहे.
यंदा जिल्हा पोलिस प्रमुखांचा अपघातमुक्त वारीचा संकल्प
आषाढी यात्रा कालावधीत यंदा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पंढरपूर आणि परिसरावर १० ड्रोनद्वारे टेहळणी करून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. याचबरोबर नवीन तंत्रज्ञानामुळे चेहरा ओळख होत असल्याने गुन्हेगारांवर लक्ष राहणार असल्याने पाकीटमार चोरांचा बंदोबस्त होणार असून यात्रेत सामील झालेल्या भाविकांची संख्या मोजता येणार आहे. अपघात मुक्त आषाढी यात्रा करण्याचा संकल्प पोलीस प्रशासनाचा असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
