पंढरपूर -आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहनकडून ५ हजार २०० विशेष बस सोडण्यात येतील, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. तसेच ग्रुप बुकिंग केल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बससेवा दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बस स्थानक, पंढरपूर येथे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे सरनाईक म्हणाले. आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी पंढरपुरात येतात. अनेक प्रवाशी स्वतःच्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींबरोबर चालत दिंडीने येतात या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. या प्रवासात देखील ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या सवलती लागू राहणार आहेत. यात्रा काळात पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चहा-नाश्ता व जेवणाची मोफत सोय करण्यात येणार आहे, असेही सरनाईक म्हणाले.
पंढरीत ४ तात्पुरती बस स्थानके उभारणार
वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर यात्रा काळात पंढरपूरमध्ये ४ तात्पुरती बसस्थानके उभारणार आहे. चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना या ठिकाणी ही बसस्थानके असतील. यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
विना तिकिट प्रवास करणाऱ्यांना लगाम
यात्रेमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडण्यासाठी पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे. तसेच एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर ठेवून असणार आहेत.
