पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती आर्थिक उत्पन्नाचा स्रोत म्हणून तुळशी पूजाची संख्या वाढवते आहे. मात्र उत्पन्न वाढीचा एक सोपा मार्ग तयार करूनही मंदिर समितीने तो गेट बंद ठेवला आहे. श्री विठ्ठल दर्शनाचे ऑनलाइन बुकिंगसाठी १०० रुपये फी चा घेतलेला निर्णय समितीने अंमलात आणलेला नाही. त्यामुळे मागील साडेचार वर्षात समितीने सुमारे ४० कोटी रुपयांवर पाणी सोडल्याचे समोर येत आहे. श्री विठ्ठल दर्शनासाठी मंदिर समितीकडून ऑनलाइन बुकिंग करून पास देण्याची व्यवस्था सुमारे १० वर्षापासून चालू केलेली आहे दिवसभरात विविध स्लॉटमधून जवळपास ३ हजार ५०० भाविकांना दर्शन अगोदरच निश्चित करण्याची व्यवस्था केली आहे आणि दहा वर्षांपासून ही व्यवस्था चांगल्या प्रकारे सुरु आहे. आषाढी, कार्तिकी सारख्या मोठ्या यात्राकाळात ही सुविधा बंद ठेवली जात असली तरी, एरवी या सुविधेचा लाभहजारो भाविक घेत आहेत. १२ जानेवारी २०१९ रोजीच्या मंदिर समितीच्या बैठकीत तत्कालीन अध्यक्ष डॉ. अतुल भोसले गैरहजर असताना मंदिर समितीने ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी प्रत्येकी १०० रुपये फी आकारण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे स्वागत सर्व वारकरी, महाराज मंडळी, स्थानिक पंढरपूरकर नागरिक आणि ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या भक्तांनीही केले होते.
वर्षाला १२ कोटी उत्पन्न मिळाले असते
श्रेयवादामुळे त्या निर्णयास त्याच दिवशी स्थगिती देण्यात आली, त्यानंतर गेल्या साडेपाच वर्षात समितीने ही स्थगिती उठवली नाही आणि तो निर्णयही रद्द केलेला नाही, त्या निर्णयाची अंमलबजावणी केली असती तर मंदिर समितीला दररोज किमान ३ लाख ५० हजार रुपये आणि महिन्याला सुमारे १ कोटी रुपये वर्षाला १२ कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले असते.
विरोध नसतानाही निर्णय बासनात
ऑनलाइन दर्शन सुविधा चालूच आहे, या माध्यमातून आर्थिक कुवत असलेले भाविक मोफत बुकिंग करून व्हीआयपी दर्शन घेऊन जात आहेत. त्यामुळे सामान्य भाविकांना दर्शन रांगेत उभा राहावे लागतच आहे. असे असताना कुणाचाही विरोध नसताना मंदिर समितीने पाच वर्षापासून आपला निर्णय बासनात गुंडाळून ठेवला आहे. आणि भाविकांना अनेक तास दर्शन रांगेत तिष्ठत उभा करणाऱ्या तुळशी पूजाची संख्या भरमसाठ वाढवली आहे.
दर्शनासाठी शुल्क आकारण्याची परवानगी पंढरपूर मंदिरे कायद्यात नाही, त्यामुळे या निर्णयास स्थगिती दिली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणा केली होती, विधानसभेतही प्रश्न उपस्थित झाला आहे. उत्पन्न वाढीचा सोपा मार्ग असला तरी निर्णय घेता येत नाही.
ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर सहअध्यक्ष, विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर
