पंढरपूर : व्हीआयपीसाठी सध्या दर्शन बंद आहे. मग आषाढी यात्रा मुख्य सोहळ्यात व्हीआयपी गाड्यांना मंदिर परिसरात येण्यास बंदी घालावी. होणाऱ्या त्रासातून भाविकांची प्रशासनाने सुटका करावी, अशी मागणी होत आहे. पंढरीत वर्षभरात भरणाऱ्या चार मोठ्या यात्रा महत्त्वाच्या आहेत यात आषाढी यात्रा मोठ्या प्रमाणावर भरते. या यात्रेला जवळ जवळ बारा ते पंधरा लाखांच्या आसपास वारकरी भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शनासाठी हजेरी लावतात. मंदिर प्रशासन महसूल प्रशासन पोलिस प्रशासन व नगरपालिका प्रशासन हे सर्व या आषाढी सोहळ्यासाठी सुख सुविधा व सोयीसाठी तसेच त्यांना इतर त्रास होऊ नये म्हणून रात्रंदिवस परिश्रम घेत असतात. आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पदस्पर्श – मुखदर्शनासाठी अलोट गर्दी उसळलेली असते. वारकरी भक्त धक्काबुक्की सहन करत अन्न पाणी भूक तहान याची परवा न करता भाविक दर्शन रांगेत १५-१५ तास उभा राहून आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो. आषाढी यात्रा काळात पद दर्शन रांगाही गोपाळपूर रोडवरील रिद्धी सिद्धी गणपतीपासून जवळजवळ स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत गेलेली असते. अशातच बराच वेळ दर्शनासाठी लागत असल्यामुळे भाविक श्री विठ्ठलाच्या कळसाचे दर्शन, श्री संत नामदेव पायरी दर्शन करून मंदिरास प्रदक्षिणा मारण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते अशातच व्हीआयपीच्या गाड्यांचा ताफा गर्दीतच घुसल्यामुळे भाविकांना ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करावा लागतो. गाड्या मंदिर परिसरात सोडू नये, अशी मागणी होत आहे.
