अखेर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी ही मागणी जाहीरपणे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली. या मागणीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले की, ‘मी प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करून या मागणीवर विचार करेन.’ दुसरीकडे, जर जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त केले, तर त्या जागी नेमकी कोणाची नियुक्ती केली जाणार? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे नाव या पदासाठी इच्छुकांच्या यादीत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. आता यावर खुद्द रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
रोहित पवार म्हणाले की, जयंत पाटील हे वर्धापनदिनी घरचा कार्यक्रम असल्यासारखे भावनिक झाले. मात्र, त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मला मिळावी, अशी माझी कोणतीही इच्छा नाही. अनेक वर्षापासून पक्षाचे काम करणारे, पक्षातील सामान्य कुटुंबातील व्यक्तींना ती जबाबदारी मिळावी, अशी माझी इच्छा आहे. आम्ही त्या नेतृत्वाखाली काम करू.
मी पदासाठी लढणारा माणूस नाही
आम्हाला विचार तोच पण शैली वेगळी, असा आक्रमक प्रदेशाध्यक्ष हवा आहे. मला जबाबदारी दिली तर मी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारणार नाही. मी पदासाठी लढणारा माणूस नाही. माझ्या मनात काय आहे हे पवार साहेबांना माहीत आहे. सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी, ही विनंती मी शरद पवार साहेबांना करेल, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
