पंढरपूर – आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीने आवश्यक सुविधा पुरविण्याबरोबरच सुलभ व सुखकर दर्शन व्हावे, यासाठी आवश्यक नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. तसेच शासकीय पूजेदरम्यानही मूखदर्शन चालू ठेवण्याची सूचना दिली.आषाढी यात्रा पूर्व नियोजनाबाबत मंदिर समितीची श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होते. बैठकीस आमदार समाधान आवताडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, वास्तु विशारद तेजस्विनी आफळे, लेखाधिकारी मुकेश अनेचा, तसेच ऑनलाईनद्वारे मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे. परिणामी विद्युत वाहक केबल अस्ताव्यस्त झाल्या असून त्या केबल 24 जून पर्यंत पूर्ववत कराव्यात. नामदेव पायरी येथे होणाऱ्या गदींचे पर्यवसन दुर्घटनेत होऊ नये, याची काळजी पोलिसांनी घ्यावी, असे सांगितले.यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, भाविकांना जलद दर्शनासाठी अतिरिक्त सु रक्षा रक्षकांची नियुक्ती मंदिर समितीकडून करण्यात येणार आहे. भाविकांसाठी समितीच्या वतीने विमा उतरविण्यात येणार आहे. दर्शन रांग, दर्शन मंडप, मंदिर परिसर या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येणार आहे. दर्शन रांगेतील भाविकांना मोफत चहा, नाष्टा जेवण देण्यात येणार असल्याचे सांगितले.तसेच मंदिर समितीकडून दर्शन रांगेत बॅरिकेटिंग, मॅट टाकणे, बसण्याची सुविधा, शुद्ध पिण्याचे पाणी, कुलर, स्वच्छता गृह विश्रांती कक्ष लाईव्ह दर्शन व्यवस्था, सार्वजनिक सूचना प्रणाली आदी व्यवस्था उपलब्ध राहणार आहे. वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी 126 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत राहणार आहेत, असे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
