अक्कलकोट – कोणी आले आणि कोणी गेले तरीही काँग्रेस पक्षाला फारसा फरक पडत नाही. त्यांना अडचणीत आणून काँग्रेस पक्ष सोडण्यास भाजपाने भाग पाडले आहे, अशी टीका खा. प्रणिती शिंदे यांनी केली.अक्कलकोट तालुक्यातील गुडेवाडी, म्हैसलगे या गावांमध्ये झालेल्या दौऱ्यात त्या बोलत होत्या. यावेळी खा. प्रणिती शिंदे म्हणाल्या, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना एकट्याला नव्हे तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेकांना सत्तेचा दुरूपयोग करत काँग्रेस पक्ष सोडून आपल्या पक्षात घेण्याचे कटकारस्थान करत आहेत. यामुळे काँग्रेस पक्षाला काही फरक पडत नाही. भाजपाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले, पण ती प्रत्यक्षात उतरवण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, अशी टीका त्यांनी केली. सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. इतर खात्यांचा निधी या योजनेसाठी वळवून अन्य योजनांवर अन्याय केला. यावेळी माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील म्हणाले, काँग्रेस पक्ष एक विचारधारा आहे. दीडशे वर्षांची परंपरा लाभलेला हा पक्ष आजही देशाच्या प्रगतीसाठी झटत आहे. काँग्रेसने कधीच जनतेला फसवले नाही. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंडा, उपाध्यक्ष अरुण जाधव, सरपंच महेश पाटील, शिवयोगी लाळसंगी, श्रीमंत देसाई, सोमनाथ दोड्याळे, गौडप्या पाटील, सिद्धाराम बुजाणपुरे, दशरथ न्हावी, श्रीशैल भतगुणको, राहुल कुलकर्णी, सुभाष बिराजदार, सिद्धय्या स्वामी आदी उपस्थित होते.
