पंढरपूर – आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी पालखी मार्ग, पालखी तळांवरील सोयीसुविधा, रस्ते, चौथऱ्यांची व्यवस्था पाहण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे दौऱ्यावर दौरे सुरू आहेत. तरीही वाखरी (ता. पंढरपूर) येथील शेवटच्या मुक्कामाचे स्थळ असलेल्या पालखी तळावरील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी चौथऱ्याच्या फरशा निखळून पडल्या आहेत. त्याची दुरुस्ती अपेक्षित असतानाही त्याकडे दुर्लक्षच असल्याने दौऱ्यांचे फलित काय? असा सवाल वारकरी, नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
वाखरी पालखी तळावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज या दोन प्रमुख संतांच्या पालख्यांसह मानाच्या इतर आठ पालख्या, शेकडो दिंड्या, पालख्या व वारकऱ्यांचा पालखी मार्गावरील शेवटचा मुक्काम असतो. त्यामुळे याठिकाणी जवळपास १० लाख भाविकांची मांदियाळी असते. या पालखी तळावर संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवण्यासाठी मेघडंबरी तर माउलीच्या पादुका ठेवण्यासाठी चौथरा बांधण्यात मात्र त्याकडे नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. माउलीच्या चौथऱ्याच्या फरशा निखळल्या वाखरी पालखी तळावरील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी चौथऱ्याच्या ग्रेनाइट फरशा निखळून इतर ठिकाणी पडलेल्या आहेत. काही ठिकाणी काँक्रीटही उखडून निघाले आहे. त्यामुळे या चौथऱ्याचे विद्रुपीकरण झाल्याचे दिसत आहे. या चौथऱ्याचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या ठिकाणी पालख्या शेवटच्या मुक्कामाला आल्यानंतर लाखो नागरिक दर्शनासाठी गर्दी करतात. म्हणून त्याची मजबूत दुरुस्ती होणे गरजेचे असताना प्रत्येकवर्षी एखाद दुसरी फरशी काढून नवीन बसविली जाते. त्यामुळे प्रत्येकवर्षी त्याची दुरवस्था कायम असते. प्रशासनाच्या या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.
वाखरी पालखी तळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये असले तरी त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पंढरपूर नगरपरिषदेची आहे. असे असले तरी सर्व कामे ग्रामपंचायतीकडूनच पूर्ण केली जातात. वारीचे अनुदान खर्ची टाकण्याचे काम पालिकेकडून केले जाते. नगरपरिषदेला या गोष्टी शक्य नसतील तर तळाचा ताबा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावा. आम्ही ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडू.सोमनाथ पोरे, माजी उपसरपंच वाखरी.
१५ दिवस अगोदर दुरुस्ती आवश्यक
आषाढी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिका प्रशासन यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांचा दिवसाआड दौरा सुरू आहे. अधिकारी येतात पाहणी करून जातात, सूचनाही देतात. मात्र, त्यानंतर कामे तातडीने होताना दिसत नाहीत. पालख्या येण्यापूर्वी १५ दिवस दुरुस्तीची, स्वच्छतेची कामे होणार नसतील तर वारकऱ्यांनी जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर दुरुस्तीला सुरुवात होणार का? असा सवाल वारकऱ्यांमधून केला जात आहे.
