राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत.त्यातच आता शरद पवार गटाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप वगळता कुणाशीही युती होऊ शकते, अशी भूमिका घेतल्याचे समजते. पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे.
राज्यात लवकरच महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. प्रभाग रचनांसंदर्भात नुकतेच आदेश जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपले पत्ते खोलायला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोडून कुणाशी देखील युतीसाठी तयार आहे, अशी माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे. यामुळे महाविकास आघाडीशिवाय युतीसाठी अन्य पक्षांचाही पर्याय पुढे येऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे.
अजित पवारांच्या पक्षाचाही पर्याय ?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाचाही पर्याय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी खुला राहणार का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युतीबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीच्या नेत्यांवर सोपवले जाणार आहेत, अशीही माहिती आहे.
