पंढरपूर – राज्य शासनाने जाहीर केलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या अभिरूप मतदानाला संभाव्य बाधितांनी मोठा प्रतिसाद देत ४८५ पैकी ४५८ जणांनी कॉरिडॉरविरोधात मतदान केले. हिंदुसभा भवन येथे आयोजित मतदानास मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. शहरातील नागरिकांमधून मात्र कॉरिडॉर करण्यास प्रतिसाद मिळत असलेले दिसून येत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर कॉरिडॉर जाहीर केल्यापासून याला बाधित नागरिक, व्यापारी यांनी विरोध सुरू केला आहे. या विरोधात विविध आंदोलने केली जात आहेत. दरम्यान, संभाव्य बाधितांची तीर्थक्षेत्र बचाव समिती स्थापन करण्यात आली असून सदर समितीच्या वतीने शनिवार, १४ रोजी अभिरूप पद्धतीने मतदान घेतले. कॉरिडॉरला विरोध दर्शविण्यासाठी बचाव समितीने हे अनोखे आंदोलन आयोजित केले होते.सकाळी दहा वाजल्यापासून संभाव्य बाधितांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संभाव्य बाधितांना नोटिसा बजावून केबीपी महाविद्यालयात चर्चेसाठी निमंत्रित केले होते. अशा नोटिसा प्राप्त नागरिक, व्यापारी यांनाच मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता. संभाव्य बाधिताची नोटीस पाहून किंवा बाधिताच्या मालमत्तेचा उतारा, वीजबिल यापैकी एक पुरावा पाहून मतदान करू दिले जात होते.
९ जण तटस्थ अन् ३ मते झाली बाद
सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. यानंतर चार वाजता मतमोजणी करण्यात आली. यामध्ये एकूण बाधित ५८५ पैकी ४८५ जणांनी मतदानात सहभाग घेतला. या ४८५ मतदारांपैकी ४५८ जणांनी कॉरिडॉरच्या विरोधात मतदान केले. तर १५ जणांनी कॉरिडॉरला पाठिंबा, ९ जण तटस्थ व ३ मते बाद ठरविण्यात आली. अनेक संभाव्य बाधित परगावी असल्याने मतदान करू शकले नाहीत.
पंढरपुरात होणाऱ्या कॉरिडॉर हा फक्त चारशे पाचशे लोकांसाठी होणार नाही. हा राज्यातील भाविकांच्या सोयीसाठी होणार आहे. यामुळे संपूर्ण शहरांमध्ये विकास होणार आहे. कॉरिडॉरबाबत संपूर्ण शहरातील नागरिकांचे मतदान घेणे गरजेचे होते. कारण या कॉरिडॉरचा संपूर्ण शहरावर परिणाम होणार आहे. त्यानंतर जी जनभावना येईल त्याचा आदर करून निर्णय घेतला पाहिजे.महेश साठे, संपर्कप्रमुख सोलापूर लोकसभा, एकनाथ शिंदे शिवसेना गट
भविष्यकाळामध्ये पंढरपूरचा विकास घडवायचा असेल तर कॉरिडॉर झालाच पाहिजे. अशी पंढरपुरातील सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे. कॉरिडॉरमध्ये बाधित लोकांना मुंबईच्या धर्तीवर पैसे मिळणार आहेत. यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही. त्या लोकांनी शहरातील लोकांना विश्वासात घेऊन मतदान घ्यायला हवे होते.किरण घाडगे, संभाजी बिग्रेड
जिल्हाधिकाऱ्यांनी कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या लोकांच्या टप्प्याटप्प्यात बैठका घेतल्या. यामध्ये बाधित लोकांचा विरोध असतानाही ८० टक्के लोकांकडून प्रतिसाद असल्याचे सांगण्यात आले. यामुळे खरी वस्तुस्थिती समजण्यासाठी आम्ही मतदान प्रक्रिया राबवली आहे. पुढच्या टप्प्यात आम्ही नागरिकांची समजूत काढून शहरातील नागरिकांचे देखील मतदान घेऊ.अभयसिंह इचगावकर, अध्यक्ष, तीर्थक्षेत्र बचाव समिती,
