पंढरपूर – गर्दीमुळे संपर्कात येणारा दरवर्षीचा अडथळा पाहता यंदा अधिकारी व वारकऱ्यांमधील संपर्काचा अडथळा दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. आषाढी यात्रेत पालखी मार्गावर १०० स्टेशन उभारण्यात येणार असून चार मोबाईल चार्जिंगचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.आषाढी यात्रेत सहभागी होणाऱ्यां वारकऱ्यांची संख्या १० ते १५ लाख असते. या वारकऱ्यांना कोणतेही अडचण येऊ नये, समस्या निर्माण होऊ नये, जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात येत असलेल्या सेवासुविधा पोहोचविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जातात. मात्र एकत्रित गर्दीमुळे मोबाइल नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यात योग्य तो समन्वय घडत नाही, परिणामी असुविधांचा बोजवारा उडतो. हीच अडचण दूर करण्यासाठी यंदा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी अधिकारी, कर्मचारी व वारकऱ्यांमधील संपर्काचा अडथळा दूर करण्यासाठी पालखी मार्गावर १०० वायफाय स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
आषाढी यात्रेतील गर्दीच्या संनियंत्रणासाठी पालखीतळावर ड्रोनचा वापर, मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणी ४०० फूट मसाजर तसेच विठ्ठल ऊर्जा रथ वारकऱ्यासांठी ४ फिरते मोबाइल चार्जिंग सुविधा निर्माण करून देण्यात येणार आहे. यात १ विठ्ठल ऊर्जा रथाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून १०० वायफाय स्टेशन उभारण्यात येणार आहेत. याचा खूप मोठा फायदा अधिकार्यांसाठी होणार आहे.
कुलदीप जंगम, सीईओ, जिल्हा परिषद, सोलापूर
एकाचवेळी होतील ४०० मोबाइल चार्जिंग…
जिल्हा परिषदेच्यावतीने विठ्ठल ऊर्जा रथ तयार केला आहे. या ऊर्जा स्थाव्दारे वारकऱ्यांना मोबाइल चार्जिंगची सुविधा निर्माण करून देण्यात येणार आहे. चार फिरत्या मोबाइल चार्जिंग सुविधेमुळे एकाच वेळी ४०० पेक्षा जास्त मोबाइल चार्जिंग होणार आहेत. या सुविधेचे नियोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे
मसाज सुविधा, हिरकणी कक्ष अन् स्नानगृह पालखी मार्गावरील
ग्रामपंचायतीच्यावतीने हिरकणी कक्ष, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, मसाज सुविधा, स्नानगृह देण्यात येणार आहेत. पावसामुळे कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जर्मन हँगर मंडपाची उभारणी करण्यात येणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळे जिल्हा परिषदेला हवा तेवढा निधी वेळेत मिळत असल्याचेही सीईओ कुलदीप जंगम यांनी सांगितले.
