पंढरपूर – अकलूज ते पिराची कुरोली, शेळवे मार्गे पंढरपूर या जुन्या पालखी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या पालखी मार्गावरून आता राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू करण्याची मागणी पालखी मार्गाच्या शेजारच्या गावांमधून गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांमधून करण्यात येत आहे.जुन्या अकलूज मार्गावर शिरढोणपाटी, माळेवाडी, शिखर ओवाळणी, खेडभाळवणी, शेळवे कॉलेज, शेळवे, पिराची कुरोली, वाडीकुरोली, खळवे, माळखांबी, बोरगाव, श्रीपूर, महाळुंग, अकलूज आदी प्रमुख गावे येतात. याशिवाय अनेक शिक्षण संस्थाही याच मार्गाच्या लगत आहेत. त्यामुळे या मार्गावरून बससेवा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांसह आजूबाजूच्या ग्रामस्थांनाही त्याचा मोठा फायदा होणार आहे. जुन्या पालखी मार्गाची दुरुस्ती ही पंढरपूर फलटण या प्रमुख पालखी मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने केली आहे. रस्ता पूर्ण होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला तरी या मार्गावरून बससेवा सुरू केली जात नाही.
आषाढी यात्रा कालावधीत होतो या मार्गाचा वापर..
हा मार्ग जुना तुकाराम महाराज पालखी मार्ग म्हणूनही ओळखला जातो. आषाढी यात्रा कालावधीत अनेक वारकरी आपली वाहने, वारकरी येण्या जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. आषाढी यात्रा सोहळ्यापूर्वी या मार्गावरून कायमस्वरूपी बससेवा सुरू केल्यास वारकऱ्यांसह स्थानिक नागरिक, विद्यार्थी, वारकऱ्यांची येणारी वाहने तसेच इतर वाहनधारकांना याचा लाभहोणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासही या मार्गावर बस सुरू केल्यास मदत होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन बससेवा सुरू करण्याची मागणी शिरढोणचे ग्रामस्थ पांडुरंग व्हरगर यांनी केली आहे.
