पंढरपूर – अनेक वर्षांची आध्यात्मिक परंपरा जपणारी आणि नवीन विचारप्रवाह सामावून घेत पुढे चालणारी पंढरीची वारी हायटेक युगात नव्या स्वरूपात पुढे जात आहे. गेल्या १५ वर्षांपासून सुरू झालेली ‘सोशल मीडिया दिंडी’ हे याच वारीचे आधुनिक स्वरूप आहे. पंधराव्या वर्षी चालणारी ही दिंडी यंदा माय मराठीला मिळालेल्या अभिजातपणाचा सन्मान करणार आहे; यंदा पालखी सोहळ्यासोबत अभिजात मराठीची वारी घेऊन येणार आहे.स्वप्निल मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या १५ वर्षापासून ‘सोशल मीडिया दिंडी’ नावाचे पेज सुरू केले आहे. त्यावरून सोहळा, वारी परंपरा, संतविचार आणि परंपरेचा प्रचार सुरू केला आहे. दरवर्षी पालखी सोहळ्यासोबत सोशल मीडिया दिंडी निघत असते.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी संतसाहित्याचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथ यांनी तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि सामाजिक समतेचे विचार लोकसुलभ मराठीत मांडले. या वर्षी अभिजात मराठीची वारी पोहोचवण्यासाठी ‘सोशल मीडिया दिंडी’ सज्ज झाली आहे. याचसोबत यंदाचे नवीन गाणे ‘चला रे पाहू सोहळा पंढरीचा’ हे गाणेदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. यासाठी सूरज दिघे, अमोल निंबाळकर, संतोष पाटील, अमोल गावडे, मंदार जाधव, सागर गंधारे, ओंकार महामुनी, निखिल पवार, सुमित चव्हाण कार्यरत असल्याची माहिती स्वप्निल मोरे यांनी दिली.
