सांगोला – सांगोला तालुक्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी येत्या १ जुलै २०२५ पासून २१ गावनिहाय बाधित क्षेत्रातील संयुक्तपणे मोजणी सुरू होणार आहे. शक्तिपीठ महामार्गात बाधित होणाऱ्या शेतजमिनीतील फळबागा, शेतीपिके, शेततळी, विहिरी, बोअर घर, गोठा बांधकामांची संयुक्त माहिती मोजणी पथकास देण्यात यावी, असे आवाहन प्रांताधिकारी बाळासाहेब माळी यांनी केले आहे.नागपूर-गोवा (पत्रा देवी) सुमारे ८०२ किमी लांबीचा शक्तिपीठ महामार्ग सांगोला तालुक्यातील २१ गावांतून पुढे जाणार असून, २१ गावांतील सुमारे ७३९ हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. ८ गावांतील सीमांकन करण्याचे काम सुरू आहे. संयुक्त होणाऱ्या मोजणीच्या अनुषंगाने २१ गावातील बाधित शक्तिपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीसाठी महसूल, मोजणी कृषी बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधी बाधित गटास प्रत्यक्ष भेट देऊन गटात असणाऱ्या फळबागा, शेतीपिके, फळपिके, विहिरी, बोअर, घर बांधकाम, जनावरे गोठा बांधकाम तसेच शेततळ्यांच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. २१ गावांतील बाधित शेतकऱ्यांना कळविलेल्या नोटीसमधील दिनांकामध्ये उपस्थित राहून मोजणी पथकास इत्थंभूत माहिती द्यायची आहे.शेतकऱ्यांची बुधवारी सांगोला तहसील कार्यालयात प्रांताधिकारी बाळासाहेब माळी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला तहसीलदार संतोष कणसे नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांच्यासह बाधित गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
