पंढरपूर: उजनी धरण ७४ टक्के भरल्यानंतर पाणी सोडण्याचा नियम आहे. सध्या धरण ५३ टक्के झाले आहे आणि पावसाची परिस्थिती पाहता यात्राकाळात चंद्रभागा नदीत पाणी जास्त येणार नाही, याचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरीत पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान, पंढरपूर शहरात अतिक्रमणास विरोध करताना, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करताना जे हस्तक्षेप करतील, त्यांच्याविरोधात कलम १८८ बरोबरच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जातील, असाही इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे उपस्थित होते.पंढरपूर शहरात रिक्षांच्या नियमबाह्य प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरटीओकडून कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र, यावेळी राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कारवाईत हस्तक्षेप केल्याकडे लक्ष वेधले असता यावर जिल्हाधिकारी म्हणाले की, आषाढी यात्रेच्या काळात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर यापुढेही कारवाई केली जाईल; तसेच अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू राहील. या कामात जर कोणी अडथळा आणला तर त्यांच्याविरोधात कलम १८८ नुसार गुन्हे दाखल होतीलच; शिवाय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसारही गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिला. येत्या २२ तारखेला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेनुसार त्यांच्या सुमारे १५०० स्वयंसेवक, प्रशासनातील कर्मचारी मिळून संपूर्ण पंढरपूर शहर एकाच वेळी स्वच्छ करण्यात येणार आहे.
आषाढी यात्रेच्या काळात पूरस्थिती निर्माण होणार नाही यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन कसे करता येईल, याबाबत पाटबंधारे विभागाशी बैठक घेऊन नियोजन केले जाईल. चंद्रभागा नदीत १० जीवरक्षक पथके आणि २० लोकांची टीम असेल. त्यांना त्यांच्या जागा ठरवून दिल्या जातील. नदीपात्रात वारकऱ्यांनी स्नान करण्यासाठी किती खोल पाण्यात जावे, याची सीमारेषा निश्चित करून दिली जाईल.
कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर
असे असेल नियोजन..
१ शहरातील नवीन बसस्थानक येथे इंटिग्रेटेड कंट्रोल रूम असतील तिथून सर्व विभागांचे खातेप्रमुख समन्वय राखून यात्रेवर नियंत्रण ठेवतील. त्यासाठी ३५० सीसीटीव्हीवरून संपूर्ण वारीवर लक्ष असेल.
२ शहरात विविध ठिकाणी १०० वायरलेस टेलिफोन असतील. ६० ठिकाणी वाय फाय पॉइंट असतील आणि २५ ठिकाणी वारकऱ्यांच्या सुविधेसाठी टेलिफोन केंद्रे असतील आणि प्रत्येक केंद्रावर २ किंवा ३ टेलिफोन असतील.
३ जिल्ह्यात पालख्यांचे आगमन झाल्यानंतर विविध ३१ ठिकाणी अतिदक्षता केंद्रे, प्रत्येक ठिकाणी ५ बेड असतील. माळशिरस, पंढरपूर येथील डॉक्टरांची टीप आयसीयूमध्ये उपलब्ध असतील.
