कुईवाडी – कुईवाडी-पंढरपूर हा रस्ता सध्या वारकऱ्यांसाठी आणि वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. मराठवाडा व विदर्भातून येणाऱ्या दिंड्या, तसेच विविध वाहने या मार्गावरून पंढरपूरकडे जातात. मार्गावरील बावी आणि रोपळे या दोन गावांजवळ या रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे वारकऱ्यांना आणि वाहनचालकांना जीवघेणा धोका निर्माण झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून शासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले असून, काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे.सहा वर्षापूर्वी सिमेंटचा दोन पदरी रस्ता बांधण्यात आला. मात्र, सुरुवातीपासूनच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जागोजागी भेगा पडलेल्या आहेत. त्या आजतागायत तशाच आहेत. संबंधित ठेकेदाराने केवळ तात्पुरती मलमपट्टी करून रस्त्याचे काम उरकले आहे. कुडूवाडी शेजारील कुई हद्दीतील पुलावरही भगदाड पडल्याने वारंवार दुरुस्ती करावी लागते. येथेही आतापर्यंत अनेक अपघातांना नागरिकांना सामोरे जावे लागले आहे.
उजनी धरणाच्या कॅनॉलवरील रस्ता धोकादायक
रोपळे (ता. पंढरपूर) गावाजवळही उजनी धरणाच्या कॅनॉलवर असलेला रस्ता सर्वात धोकादायक आहे. दिवसाही कॅनॉलमधील खड्डा दिसत नाही, रात्री तर तो अजूनच अदृश्य होतो. त्यामुळे अनेक वाहने भरधाव वेगात येऊन कॅनॉलमध्ये पडतात आणि मृत्युमुखी पडतात. शासनाने येथे केवळ छोटे अपघाती क्षेत्राचे बोर्ड लावलेले आहेत. जे वाहनचालकांना दिसत नाहीत. वारकरी आणि वाहनधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी आषाढी वारीच्या आधी ठेकेदार तात्पुरती मलमपट्टी करतो. मात्र वर्षभर मोठ्या खड्यांचा त्रास सर्वांना सहन करावा लागतो. बावी आणि रोपळे येथे कायमस्वरूपी पूल आणि दर्जेदार रस्ता करण्याची मागणी वारंवार होत आहे.
कुडूवाडी-पंढरपूर रस्त्याबाबत तक्रारी खूप आहेत. बावी व रोपळे गावच्या नजीक रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने छोटे-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या साईटलादेखील चिल्लार व इतर झाडाझुडपांची जागोजागी रांग दिसून येते. त्याच्यामुळेदेखील अपघातास निमंत्रण मिळत आहे.
संजय लोकरे माजी उपसरपंच, लऊळ
