एचआयव्ही हा असा व्हायरस आहे, जो एकदा रक्तात मिसळला की त्यापासून सुटका होत नाही. या विषाणूमुळे एड्स हा आजार होतो. या विषाणूला पूर्णपणे मारणारे अजून कोणतेही औषध सापडलेले नाही. तसेच या विषाणूपासून बचाव व्हावा, यासाठी अद्याप कोणतीही लस तयार करण्यात यश आलेले नाही. मात्र, या विषाणूला बऱ्यापैकी रोखून ठेवणारे एक इंजेक्शन आले आहे. या इंजेक्शनला अमेरिकेने मंजुरी दिली असून एड्सविरोधी लढ्यात हे मोठे यश मानले जात आहे.
अमेरिकेच्या एफडीएने नुकतेच लेनाकॅपाव्हीर या औषधाला प्री-एक्स्पोझर प्रोफायलॅक्सिस (एखाद्या आजाराच्या संपर्कात येण्याआधीच त्या आजाराविरोधात सुरक्षा प्रदान करणे) म्हणून मंजुरी दिली. हे औषध इंजेक्शनच्या रुपात घेता येणार आहे. प्रत्येक ६ महिन्याला हे इंजेक्शन घेतल्यास एचआयव्हीपासून बचाव करता येऊ शकतो. या इंजेक्शनपासून एचआयव्हीपासून बचाव होत असला तरी तो एचआयव्हीवरील उपचार नाही. हे इजेक्शन घेतल्यानंतर एचआयव्हीला रोखणे शक्य होणार आहे. जे लोक एचआयव्हीचा संसर्ग असलेल्यांच्या संपर्कात आलेले नाहीत, त्यांचीच हे इंजेक्शन सुरक्षा प्रदान करू शकते. या इंजेक्शनवर मंजुरीआधी संशोधन करण्यात आले होते. यावर एकूण तीन ट्रायल घेण्यात आल्या. प्रयोग केल्यानंतर ज्या महिलांनी हे इंजेक्शन घेतले होते, त्यांचे एचआयव्ही विषाणूपासून १०० टक्के रक्षण झाले तर हे इंजेक्शन घेतलेल्या एकूण पुरुषांपैकी फक्त ०.१ टक्के पुरुषांमध्ये एचआयव्हीचे संक्रमण दिसून आले. या संशोधनाला न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडीसीनमध्ये प्रकाशित करण्यात आले.
दर ६ महिन्याला घ्यावा लागणार डोस
लेनाकॅपाव्हीरचे एकदा इंजेक्शन घेतल्यावर तो शरीरात ६ महिन्यांपर्यंत सक्रीय असतो. ६ महिन्यांनंतर पुन्हा नवा डोस घ्यावा लागतो. हा डोस घ्यायचा असेल तर प्रत्येक ६ महिन्यांनी एचआयव्ही टेस्ट करणे गरजेचे आहे.
