पंढरपूर :पालखी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी यंदा चार ड्रोन कॅमेरे असणार आहेत. याद्वारे गर्दीवर नियंत्रण, भाविकांची संख्या मोजण्यासाठी शिवाय चेन स्नॅचिंग किंवा अशा अनाहूत घटना घडू नये यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जाणार आहे. तसेच जवळपास सात हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मागील दोन वर्षांप्रमाणे यंदाही अपघातमुक्त वारीसाठी नियोजन केल्याची माहिती गुरुवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.मागील चार दिवसांपासून विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी हे सोलापूर ग्रामीण दलाची पाहणी करीत आहेत. गुरुवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी माहिती दिली. पुण्यापासून ते सोलापूरपर्यंतच्या पालखी मार्गावर पाहणी केली. यावेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलिस उपअधीक्षक विजयालक्ष्मी कुर्री, संकेत देवळेकर, आदी अधिकारी उपस्थित होते. पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा पोलिसांनी संकल्प केला असून, या सर्व महामार्गावर झाडे लावण्यात येत आहेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी पुणे ग्रामीण, सातारा ग्रामीण, सोलापूर ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. हा बंदोबस्त टप्प्याटप्प्याने लावण्यात येईल. याशिवाय पोलिस महासंचालक कार्यालयाकडून ही बॉम्बशोधक पथक, एसआरपीएफ, आदी पथकांचा बंदोबस्त असणार आहे. हा बंदोबस्त दिंडीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत असेल. यंदा वारीसोबत जनरेटरही असणार आहे.
उलट गर्दी येणार नाही मंदिर परिसरात भाविक हे दर्शन घेतल्यानंतर धाश्रोत भाविक हे नामदेव
पायरी तेथून घाटाकडे, व्हीआयपी गेट अशा विरुद्ध दिशेने पुन्हा मंदिर परिसरात येतात. त्यामुळे या परिसरात भाविकांची गर्दी होते. यासाठी पोलिस प्रशासनाकडून गर्दी टाळण्यासाठी बॅरिगेट लावण्यात येणार आहे. शिवाय दर्शनानंतर भाविक हे मंदिराला वळसा घालून तुकाराम भवन, पश्चिम घाट मार्गे बाहेर पडतील अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. यासाठी पोलिसांचे विशेष पथक असणार आहे. तसेच सुरक्षेसाठी यंदा नदीपात्रात असणाऱ्या बोटी आणि होडी चालकांची मान्यता, त्यांचे प्रशिक्षण, सुरक्षेचे साहित्य याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती फुलारी यांनी दिली.
पोलिस निवासस्थानासाठी १० कोटींचा निधी
पोलिसांच्या निवासस्थानासाठी पंढरपूर येथे इमारती बांधण्यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याचे काम सुरू झाले असून, यात चार मजली इमारत असणार आहे. हे डॉरमॅट्रीसारखे असणार असून, यात पोलिसांना निवासस्थानची सोय करण्यात आली आहे.
खून-दरोड्याच्या गुन्ह्यात घट सोलापूर ग्रामीण पोलिसांचे गंभीर गुन्ह्याचे उघडकीस आणण्याचे प्रमाण हे ८४ टक्के आहे. यात वाढ करुन ९० टक्के पर्यंत आणावे. जिल्ह्यात गुन्हे, खून, दरोडा, घरफोडी अशा घटनांमध्ये घट झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्रतिबंधात्मक कारवाईमुळे ही घट झाल्याचे त्यांनी सांगितले.
