राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका देत करुणा शर्मा यांना लागू झालेल्या पोटगीतील ५० टक्के रक्कम ४ आठवड्यात न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयानंतर करुणा शर्मा यांनी कोर्टाचे आभार मानले. कोर्टाने मला न्याय दिल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने करुणा मुंडे यांना पोटगी पोटी २ लाख रुपये देण्याचे आदेश धनंजय मुंडे यांना दिले होते. या निर्णयाच्या विरोधात मुंडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणीत धनंजय मुंडे यांनाच उच्च न्यायालयाने दणका दिला. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा या पोटगीस पात्र असल्याचे मान्य करत त्यांना दरमहा १ लाख २५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. यालाच धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठापुढे सुनावणी पार पडली आणि न्यायमूर्तीनी धनंजय मुंडे यांनाच दणका दिला. ऑगस्ट २०२२ ते जून २०२५ या ३५ महिन्यांच्या कालावधीची एकूण रक्कम ४३ लाख ७५ हजार इतकी आहे. यातील २१ लाख ८७ हजार ५०० रुपये ही ५० टक्के रक्कम वांद्रे न्यायालयात पुढील ४ आठवड्यात जमा करा. तसेच करुणा मुंडे यांची मुलगी हिच्यासाठी असलेली पोटगीची रक्कम १०० टक्के कोर्टात जमा करा, असा आदेश देतानाच या याचिकेवर ८ आठवड्यांनी अंतिम निर्णय देऊ, असे कोर्टाने म्हटले.
