मुंबई – प्रतिनिधी आता उच्च सुरक्षा क्रमांक नोंदणी पाटी लावण्यासाठी वाहनधारकांना १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवार दि. २० जून रोजी दिली आहे. राज्यात २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक केले आहे. यासाठी राज्यातील वाहनधारकांची गडबड सुरू आहे. पण, पाट्यांचा पुरवठा कमी असल्यामुळे नोंदणीमध्ये अडचणी येत आहेत. यामुळे आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ३० टक्के वाहनधारकांनीच नोंदणी पाटी बसवून घेतली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वीची राज्यात दोन कोटी वाहने आहेत. या वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार परिहवन विभागाने फेब्रुवारी महिन्यापासून अंबलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. आधी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. यानंतर ही मुदत ३० एप्रिल केली. मधल्या काळात अपुरी केंद्रे, प्रशिक्षित कामगारांचा अभाव आणि इतर तांत्रिक त्रुटींचा अभाव असल्याने अनेकांना अडचणी आल्या. यामुळे पुन्हा एकदा परिवहन विभागाने ही मुदत ३० जूनपर्यंत वाढवली होती.
