पुणे – अभंग, भक्तिरचना, भजन आणि कीर्तन यामध्ये वारकरी, भाविक तसेच पुणेकर रंगून गेले आहेत हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाचा गजर यामुळे सारी पुण्यनगरी दुमदुमून गेली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण तयार झाले आहे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यांचे शुक्रवारी रात्री पुण्यनगरीत टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात तसेच भक्तीमय वातावरणात आगमन झाले. विशेष म्हणजे वरुणराजाने विश्रांती घेतली त्यामुळे भाविकांचा आनंद द्विगुणित झाला होता. रविवारी सकाळी पालखी सोहळे श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत शहराच्या विविध भागात आणि मध्य वस्तीत, मंदिरात वारकऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच पावसाची हजेरी नसल्यामुळे आनंदाला पारावार उरला नाही.पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे तसेच विविध भागातील सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष, सार्वजनिक मंडळे यांच्या वतीने वारकऱ्यांची सेवा करण्यात येत आहे तसेच आरोग्य सेवा देण्यासाठी औषधे, वैद्यकीय पथक उपलब्ध करण्यात आले आहे.पालखी सोहळ्यातील वारकरी आणि भाविकांना पुण्याच्या मुक्कामात सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून विविध संस्थांच्या वतीने मोफत चष्मा, रेनकोट, शर्ट, साडी प्रदान करण्यात आली. सुमारे पाच हजार वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. वारकरी आणि भाविकांसाठी चहा-अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, गुरु शांतिनाथ, राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे, पुरुषोत्तम पाटील, रोहिणी पवार, चैतन्य लोंढे, पालखी विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, विश्वस्त प्रमोद बेंगरूट, शिवाजीराव जगदाळे, गोरख भिकुले आदी उपस्थित होते.
मुस्लिम सेवेकरी करतोय वारकऱ्यांची सेवा
जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला आहे. या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरीही पुण्यात दाखल झाले आहेत. या वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम अनेक जण करत असतात. मात्र, मूळचे पुण्याचे असणारे व सध्या हैदराबाद येथे स्थायिक असणारे अब्दुल रजा हे गेल्या वीस वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम करत आहेत. सर्व जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन ते वारकऱ्यांची सेवा करतात. वारकऱ्यांची मालिश करून वारकऱ्यांचे दुःख दूर करण्याचे काम करतात.
