पुणे – आषाढी एकादशीसाठी मानाच्या पालख्यांसह शेकडो दिंड्यांनी पंढरीची वाट धरली असून, लाडक्या विदुरायाच्या भेटीसाठी वारकरी मजल-दरमजल करत पाऊले टाकत आहेत. आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुण्यातून सासवडच्या दिशेने प्रस्थान झाले. आज या पालखीने अवघड असा दिवेघाट पार केला. दिवे घाट पार करताना घाटाने जणू हिरवा शालू नेसल्यासारखे दिसत होते. पांडुरंग हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम… असा जयघोष करत अवघा दिवे घाट आज दुमदुमला होता. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत आज हजारो वारकऱ्यांची पाऊले दिवे घाटात चालताना पाहायला मिळाली. निसर्ग सौंदर्याने नटलेला, हिरवळीने सुंदर सजलेला दिवे घाट टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमला होता.
