पंढरपूर – महाराष्ट्रातून आषाढीसाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत. अशातच महाराष्ट्रातील ९० शहरांतील १०० क्लबमधील ४ हजार १०० सायकल्सची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आहे. या निमित्ताने सायकलस्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगरप्रदक्षिणा केली. सायकलवारीच्या माध्यमातून भाविक आरोग्य व पर्यावरणाचा संदेश आपापल्या गावी घेऊन गेले पाहिजेत. ‘फिटनेस का डोस, सायकलिंग आधा घंटा रोज’, तसेच ‘प्रत्येकाने एक झाड आपल्या आईच्या नावाने लावावे’, अशी घोषणा केंद्रीय राज्य क्रीडामंत्री रक्षा खडसे यांनी दिली.पंढरपुरात रविवारी अखिल महाराष्ट्र सायकलवारी, पंढरपूर यांच्या वतीने सायकल संमेलन घेण्यात आले आहे.केंद्रीय राज्यमंत्री क्रीडा व युवक कल्याण रक्षा खडसे, पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, युटोपियन साखर कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी सायकल दिंडीचे उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला.तसेच राजेंद्र वानखेडे (नाशिक), श्रीनिवास वायकर (बारामती), चंद्रकांत नाईक (नाशिक), श्रावण उगले (लातूर), पंढरपूर सायकलवारी समितीचे प्रकाश शेटे, अभिजीत कुलकर्णी, महेश भोसले, रवींद्र दुसाने (नाशिक), तसेच फिट इंडिया, सायकल ऑन संडे, पर्यावरण संवर्धन, पंढरपूर सायकलवारी २०२५ यांचा समावेश होता. यावेळी दिंडीतील प्रमुखांनी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने सायकल दिंडीत सहभागी होणाऱ्या लोकांची राहायची सोय व्हावी, तसेच पोलिस सुरक्षा मिळावी, अशी मागणी केली.
रेल्वे मैदानावर रिंगण सोहळा
पंढरपुरातील रेल्वे मैदान येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात विठु नामाचा गजर करत, ४५०० सायकल स्वारांनी रिंगण सोहळा साजरी केला. यामध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, युटोपीन साखर कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता.
भारत सरकार १०० टक्के मदत करणार
१ सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सायकल ऑन संडे हा उपक्रम राबवत आहेत. सायकल संदर्भातला हा इव्हेंट देशभरातील हा मोठा इव्हेंट आहे. पंढरपूर महाराष्ट्राचा अभिमान आहे. मी महाराष्ट्रातील आहे, यामुळे पुढच्या वर्षी या सायकल वारीत देखील राज्यातून जादा लोक सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच या सायकलवारीला भारत सरकार १०० टक्के मदत करणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.
२ ‘फिट इंडिया’ या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत या दिंडीमध्ये सायकलसारख्या व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यात आले. राज्यातील कोनाकोपऱ्यांतून आलेल्या सायकलस्वारांमुळे आज पंढरी नगरी वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात सामावून गेलेली पाहायला मिळाली. यावेळी पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते.
