मोहोळ – बेघर लाभार्थ्यांना शासकीय जागा मिळवून देण्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल मोहोळ पंचायत समितीला पुणे विभागात पहिल्या क्रमांकाचे बक्षिस देऊन गौरविण्यात आले.बेघर लाभार्थ्यांना विविध शासकीय योजना अंतर्गत घरकुल उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर केली. मात्र काही लाभार्थ्यांना स्वतःची जागा उपलब्ध नसल्याने घरांचे बांधकाम होत नव्हते. अशांना शासकीय जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला. या कामांमध्ये मोहोळ पंचायत समितीने पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे पहिला क्रमांक प्राप्त केल्याबद्दल पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात मोहोळ पंचायत समितीला गौरविण्यात आले. ग्रामीण विकास तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते व विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अप्पर उपायुक्त विजय मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.पुरस्कार हसीलदार सचिन मुळीक व गटविकास अधिकारी विवेक जमदाडे यांचे वतीने सहाय्यक गटविकास अधिकारी विजयकुमार देशमुख यांनी स्वीकारला. यावेळी पंचायत समिती मोहोळचे उत्कृष्ट काम करणारे विस्तार अधिकारी नागसेन कांबळे व वरिष्ठ सहाय्यक नागेश भालेराव हे उपस्थित होते. मोहोळ पंचायत समितीचे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व प्रकल्प संचालक ठोंबरे यांनी अभिनंदन केले आहे.
