पंढरपूर: विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या जमिनी संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेल्या आहेत. त्या जमिनी वहिवाटीस देण्याबाबत प्रतिसाद कमी मिळत असल्याने, ११ महिने ऐवजी ३३ महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर देणेकामी शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. याशिवाय, त्या जमिनी वहिवाटीस प्रतिसाद मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे पार पडली. बैठकीला मंदिर समितीचे सदस्य शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, अँड . माधवीताई निगडे, ह. भ. प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह. भ. प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.आषाढी वारीच्या अनुषंगाने पदस्पर्श दर्शनरांगेत अत्याधुनिक पद्धतीच्या १२ पत्राशेड उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या दर्शनरांगेत संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपापासून कासार घाटापर्यंत २२० मीटर लांबीचा स्कायवॉक, स्कायवॉक ते पत्राशेडपर्यंत वासे व बांबूचे बॅरिकेटिंग करून वॉटरप्रुफ मंडप उभारणे, पत्राशेडपासून गोपाळपूर येथील स्वेरी कॉलेजपर्यंत बॅरिकेटिंग, दर्शनरांगेत बसण्यासाठी बाकडे, रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सहा ठिकाणी उड्डाणपूल, तीन ठिकाणी विश्रांती कक्ष, आषाढी यात्रा कालावधीत मंदिर समितीने भाविकांच्या सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य दिले आहे. भाविकांना चांगल्या व पुरेशा प्रमाणात देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे. त्याचा आढावा घेण्यात आला.
गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यंदा प्रथमच दर्शनरांगेत पाणी वाटपाच्या स्टॉलसोबत फिरते गाडे ठेवण्यात आले आहेत. मुखदर्शन रांगेत छत्रपती संभाजी चौक येथे सरकता उड्डाणपूल बसविण्यात येणार आहे. याशिवाय, स्वयंसेवी संस्था, उपजिल्हा रुग्णालय व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत वैद्यकीय सुविधा देण्यात येणार असून, यात्रेची पूर्वतयारी झाली असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
