पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी २४ जून रोजी टोकन दर्शनाचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेत प्रवेश करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील ६ व्यक्तींना मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी पकडले आहे. त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांनी समर्पक उत्तर न दिल्याने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.मंदिर समिती मार्फत दर्शनरांगेतील भाविकांचे सुलभ आणि जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार, श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभआणि जलद दर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने १५ जून पासून टोकन दर्शन प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्या टोकन दर्शन प्रणालीचे पासेस मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर बुकिंगची सोय आहे. त्यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, याशिवाय त्याच्या चांगल्या प्रतिक्रियाही उमटत आहेत.
२४ जून रोजी सकाळी ९ वाजता हिंगोली जिल्ह्यातील पार्वतीबाई बापूराव बेले, लक्ष्मीबाई केशवराव बळे, संध्या मारुतीराव सातपुते, अरुणा विठ्ठलराव सातपुते, सुधाकर रामचंद्र भालेराव आणि केशव गणपतराव हरबळे या व्यक्ती टोकन दर्शन प्रणालीचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेतील प्रवेशद्वारावर आल्यानंतर नियमानुसार पासची तपासणी केली असता, पास बोगस असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांना पंढरपूर शहर पोलिस ठाणे यांच्या ताब्यात देऊन, त्यांच्यावर कारवाई करण्याची कार्यवाही सुरू आहे.
क्यूआर कोड स्कॅन केल्याने लक्षात आला बोगस पास
श्री संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप येथे होणाऱ्या टोकन दर्शनपास तपासणी केंद्रात भाविक आले. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी टोकन दर्शन पासवरील क्यूआर कोड स्कॅन केला. यावेळी त्यांनी आणलेल्या पासवरील माहिती वेगळी आणि ऑनलाइन दाखवत असलेल्या पासची माहिती वेगळी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, सर्व सातच्या सात लोकांच्या पासची तपासणी केली. यावेळी त्यावरील फोटो, नावे वेगळे होते. मात्र, काही पासवर नंबर्स एकसारखे होते.
