पंढरपूर – आषाढी शुद्ध एकादशी सोहळा ६ जुलै २०२५ रोजी असून, या सोहळ्यात वारकऱ्यांसाठी चंद्रभागा स्नान फार पवित्र मानले जाते. यात्रा कालावधीत चंद्रभागा स्नानासाठी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. सद्यःस्थितीत भीमा नदी पात्रात उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी चंद्रभागा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग किती प्रमाणात आल्यानंतर वाळवंट किती प्रमाणात शिल्लक राहील या पूरजन्य परिस्थितीचा आराखडा तयार करून त्वरित सादर करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यावेळी दिल्या.आषाढी यात्रेच्या अनुषंगाने श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास, पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त पुलकुंडवार म्हणाले, चंद्रभागा नदीची वाढती पाणीपातळी लक्षात घेऊन वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात वारकरी-भाविकांना तसेच दिंड्यांना वाहतुकीचा कोणाताही त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्गावरील व शहरातील अतिक्रमणे तत्काळ काढावीत.यात्रा कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थ, प्रसादाची दुकाने यांच्या वेळोवेळी तपासण्या कराव्यात. तसेच मठ व धर्मशाळा येथे मोठ्या प्रमाणात अन्न व फराळाचे पदार्थ बनविण्यात येतात. याबाबत संबंधितांना योग्य मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी दिल्या.
वेळोवेळी पिण्याच्या पाण्याची तपासणी..
१ पालखी मार्गावर भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वेळोवेळी पिण्याच्या पाण्याच्या तपासण्या करण्यात येत आहेत. त्याचबरोबर महिला भाविकांसाठी स्नानगृहांची संख्या वाढवण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत गर्दी व्यवस्थापन, चंद्रभागा नदी पात्रात 3 होडीतून होणारी जलप्रवासी वाहतूक आदींबाबत आवश्यक नियोजन करण्यात आले असून, होडीच्या चालकांना व मालकांना होडीत जलप्रवासी वाहतुकीसाठी एकूण १ हजार ५० लाइफ जॅकेटची उपलब्धता करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी सांगितले
