जेजुरी- ‘जगी ऐसा बाप व्हावा। ज्याचा वंश मुक्तीस जावा।। पोटा येतां हरले पापा । ज्ञानदेवा मायबापा।।’ या तुकारामांच्या ओवीच्या सुरात दिंडीकरी वैष्णव मंगळवारी कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाच्या नगरीत सायंकाळी ५:३० वाजता पोहोचले. जेजुरीकरांनी व जेजुरी नगरपालिका, मार्तंड देवसंस्थान यांच्या वतीने भंडाऱ्याची उधळण करीत सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.सोन्याची जेजुरी जेजुरी। तेथे नांदतो मल्हारी, माझा मल्हारी मल्हारी ॥ आलो तुमच्या दारी। द्यावी आम्हा बेलभंडाराची वारी ।। अशा ओव्या आणि टाळ-मृदंगाच्या गजराने जेजुरीनगरी दुमदुमली. वैष्णवांनी कुलदैवत खंडोबाचे भंडार खोबऱ्याची उधळण करीत गडकोटात ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ आणि ‘ज्ञानोबा माउली’च्या जयघोषात दर्शन घेतले. आज सकाळी ७ वाजता श्री संत सोपानकाकांच्या सासवड नगरीचा निरोप घेऊन सोहळ्याने कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजुरीकडे प्रस्थान ठेवले. संपूर्ण ढगांनी आच्छादलेले आभाळ, आल्हाददायक वातावरण आणि सळणाऱ्या पावसाच्या सरी, अंगावर पर्जन्यवृष्टी घेत दिंडी-दिंडीतून येणारे अभंग, भूपाळी, वासुदेव, गौळणी, आंधळे, पांगळे, गुरुपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग आदींचे सूर संपूर्ण वातावरणात चैतन्य आणि उत्साह निर्माण करीत होते. या उत्साही वातावरणात सोहळ्यातील वैष्णव झप झप पावले टाकीत खंडोबाची जेजुरी जवळ करीत होता. ‘ज्ञानोबा माउलीं’ च्या गजरात सोहळा जेजुरीकडे येत असताना, सकाळी ९ वाजता बोरवके मळा येथील न्याहारी उरकून मार्गस्थ झाला. यावेळी वरुण राजाने चांगलीच उघडीप दिल्याने सोहळ्याने शिवरी जवळ केली. शिवरी येथील दुपारची विश्रांती उरकून पुढे बरोबर साकुर्डे येथील विसावा उरकला. साकुर्डे येथे सरपंच राजेंद्र जाधव, ग्रामपंचायत सदस्य, साकुर्डेकर व बेलसरकर ग्रामस्थांनी स्वागत केले. यानंतर ‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात सायंकाळी पाच वाजता मजल दरमजल करीत सोहळा जेजुरीत पोहोचला.
जेजुरीत पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, आजी माजी पालिका पदाधिकारी आदींनी माउलींच्या सोहळ्याचे स्वागत केले. मार्तंड देवसंस्थानच्या वतीने ही प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते, विश्वस्त मंगेश घोणे, पोपट खोमणे, अॅड. विश्वास पाणसे, अनिल सौन्दडे, पांडुरंग थोरवे, डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी भंडाऱ्याच्या उधळणीत माउलीचे स्वागत केले.
