पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरमार्फत विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून मोफत भोजनप्रसाद तसेच अल्प देणगीमूल्य आकारून लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो. हा लाडूप्रसाद व भोजनप्रसाद अन्न व औषध प्रशासनाकडील सर्व नियमांचे पालन करून तयार करण्यात येत असल्याने भारतीय खाद्यसुरक्षा आणि मानक प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडून मंदिर समितीस ‘भोग प्रमाणपत्र’ मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.मंदिर समितीमार्फत आवश्यक कच्चा माल खरेदी करून एमटीडीसी भक्तनिवास येथे लाडूप्रसाद व श्री संत तुकाराम भवन येथे भोजनप्रसाद तयार करण्यात येतो. या दोन्ही ठिकाणांची संबंधित कार्यालया मार्फत अनेक वेळा पाहणी व तपासणी करण्यात आली. त्यामध्ये जागास्वच्छता, कर्मचाऱ्यांचे आरोग्यविषयक प्रमाणपत्र, सुरक्षा साधनांचा वापर, अॅप्रन, हँडग्लोव्हज व इतर आनुषंगिक बाबींचा वापर, शासनमान्य कच्च्या मालाचा वापर व इतर आनुषंगिक बाबींची तपासणी करण्यात आली; तसेच काही सूचना व सुधारणा मंदिर समितीस सुचवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती व सुधारणा करण्यात आल्यानंतर संबंधित कार्यालयामार्फत अंतिम पाहणी करून मंदिर समितीस हे प्रमाणपत्र २७ जून रोजी बहाल करण्यात आले आहे.असे प्रमाणपत्र मिळवणारी मंदिर समिती ही जिल्ह्यातील एकमेव धर्मादाय संस्था ठरली आहे. मंदिर समितीमार्फत भाविकांना पुरेशा प्रमाणात सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामध्ये भाविकांना अन्नदान व लाडूप्रसादाची व्यवस्था देण्यात येते. सदरचा भोजनप्रसाद व लाडूप्रसाद अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून तयार करण्यात येत आहे. सदर प्रमाणपत्र मिळाल्याने सर्व स्तरांवरून कौतुक होत आहे. यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सर्व सदस्य, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच संबंधित कार्यालयाचे अधिकारी यांचे चांगले मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.
