पंढरपूर – आषाढी वारीच्या काळात सुरळीत वीजपुरवठा ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा काम करीत आहे. पालखी तळ व गर्दीच्या ठिकाणची तार बदलण्यात आली असून, त्या ठिकाणी एबी केबल टाकण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर अचानक तांत्रिक कारणामुळे वीज यंत्रणेत बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था महावितरणने उभी केली आहे.पंढरपुरात धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपणारी आषाढी वारी ६ जुलै रोजी होत आहे. राज्यभरातून २० ते २५ लाख भाविक पंढरपुरात येण्याची शक्यता गृहीत धरून महावितरणने वीजपुरवठ्याची यंत्रणा उभी केली आहे. पंढरपूर विभागीय कार्यालयाकडून विठ्ठल मंदिर, मंदिर परिसर, वाळवंट, गोपाळपूर, ६५ एकर, पंढरपूर शहर, पिराची कुरोली, पालखी तळ, वाखरी पालखी तळ, है. बाजीराव विहीर, रिंगण परिसरात महावितरणने वीज यंत्रणा सक्षम केली आहे. कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची खबरदारी महावितरणच्या यंत्रणेने घेतली आहे
उपकेंद्र, भूमिगत वाहिन्यांची झाली दुरुस्ती
३३ केव्ही उच्च वीजवाहिनी, पद्मावती, लिंक रोड, पिराची कुरोली, खेड, भाळवणी, भंडीशेगाव, गादेगाव, वाखरी, गुरसाळे, देगाव, करकंब येथील उपकेंद्र, तसेच पंढरपूर शहरातील उच्चवीज, लघुदाब, उपरी व भूमिगत वाहिन्यांची दुरुस्ती व देखभाल करण्यात आली आहे
गर्दीच्या ठिकाणची बदलली वायर
पालखी तळ व मंदिर परिसरातील गर्दीच्या ठिकाणची केबल बदलण्यात आली असून, त्या ठिकाणी एबी केबल टाकलेली आहे. याशिवाय स्पेसर्स बसविण्यात आले आहे. लोखंडी पोलला असलेल्या स्टे वायरला प्लास्टिकचे पाइपचे आवरण घातलेले आहे. रस्त्यांच्या क्रॉसिंगच्या ठिकाणी गार्डिंग केले आहे.
एखाद्या भागाचा वीजपुरवठा खंडित झाल्यास त्या ठिकाणी पर्यायी वीजपुरवठा करण्याची उपाययोजना केलेली आहे. विद्युत सुरक्षेसंदर्भातील घ्यावयाची काळजी याची माहिती जागोजागी प्रदर्शित करण्यात आलेली आहे. महावितरणचे हजारो अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत.
पाटील, कार्यकारी अभियंता, पंढरपूर
आषाढी वारीत २४ तास वीजपुरवठा सुरू राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत वीज बंद होणार नाही, याची पूर्णपणे काळजी आम्ही घेत आहोत. तरीही, काही तांत्रिक अडचण आल्यास पर्यायी व्यवस्था आम्ही तयार केली आहे. यंदाच्या आषाढी वारी निर्विघ्नपणे पार पडेल.
सुनील माने, अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल, महावितरण
