पंढरपूर – आषाढी एकादशीनिमित्त सोलापूर विभागातून हुबळी ते पंढरपूर अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १ ते ८ जुलैपर्यंत १४ गाड्या धावणार आहेत. या रेल्वेमुळे बेळगावसह खानापूर तालुक्यातील वारकऱ्यांची सोय होणार आहे.विशेष ही रेल्वे गाडी हुबळीतून पहाटे ५:१० वाजता सुटणार असून, ती लोंढा स्थानकावर सकाळी ६:५८ वाजता, तर खानापूरला ७:२७ वाजता पोहोचणार आहे. ती बेळगाव रेल्वे स्थानकावर ८:१५ वाजता येणार असून, ८:२० वाजता मार्गस्थ होणार आहे. सायंकाळी चार वाजता ती पंढरपूरला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही रेल्वे त्याच दिवशी सायंकाळी ६:०० वाजता पंढरपूरमधून सुटणार असून, बेळगावला रात्री १२:०५ वाजता पोचणार आहे. खानापूरला रात्री १२:४० वाजता व लोंढा स्थानकावर मध्यरात्री १:२९ वाजता पोहोचेल.तीन अतिरिक्त गाड्या आषाढी एकादशीसाठी सोलापूर विभागातील स्थानकांवरून वारकऱ्यांसाठी तीन अतिरिक्त गाड्या धावणार आहेत. पुणे – मिरज, मिरज-नागपूर, मिरज- लातूर (अनारक्षित विशेष) प्रत्येक गाडीची एक फेरी होणार आहे. मिरज-नागपूर ही सांगोला, पंढरपूर, कुडूवाडी स्टेशनवर थांबणार आहे. मिरज – लातूर ही सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुडूवाडी स्टेशनवर थांबणार आहे.
हुबळीला ती पहाटे ४:०० वाजता पोचणार आहे. ही रेल्वे बेळगाव स्थानकावर पाच मिनिटे थांबणार असून, अन्य लहान स्थानकांवर एक ते दोन मिनिटे थांबेल. सोलापूर रेल्वेने विशेष गाडीची व्यवस्था केल्याने बेळगाव, खानापूरसह जिल्ह्यातील वारकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे. गाडी दिवसा धावणार असल्याने वारकऱ्यांना विठुरायाचे दर्शन करून परतणे सोयीस्कर होणार आहे.
