पंढरपूर- श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या सोयीसाठी टोकन दर्शन सुरू केले होते. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाचे २४ तास दर्शन सुरू झाल्याने सदर टोकन दर्शन २७जून ते १७ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. १७ जुलैनंतर सदर टोकन दर्शन सुरू राहणार असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे.श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या टोकन दर्शन व्यवस्थेला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून दर्शनासाठी व्यवस्थित रांगा, वेगवान गतीने होत असलेले संचलन आणि सुरळीत यंत्रणेमुळे अधिक भाविकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता जाणवत होती. त्यानुसार मंदिर समितीने टोकन दर्शनाचा निर्णय घेतला आहे.दर तासाला दिल्या जाणाऱ्या टोकन संख्येत १०० ने विठ्ठलाच्या २४ तास दर्शनाला वाढ करताना भाविकांना अधिक सुलभतेने आणि कमी वेळेत दर्शन घेता यावे हा हेतू आहे. एकूण ६ स्लॉटमध्ये प्रत्येकी १०० टोकन असे एकूण ६०० टोकन पास वाढ करण्यात येणार आहे. २१ जून ते २६ जूनपर्यंत दर्शनासाठी वेळ, सुरक्षा, आणि भाविकांच्या सोयीचा विचार करून ही सुधारणा करण्यात आली होती. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी असेही स्पष्ट केले की, भाविकांनी अधिकृत टोकन ऑनलाईन प्रणालीद्वारेच https://www.vitthal-rukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावर बुक करावे व अफवांपासून दूर राहावे. ही व्यवस्था भाविकांच्या सुविधेसाठी असून यामधून अधिकाधिक लोकांना श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या काही दिवसांत आषाढी वारीची गर्दी वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर समितीकडून सतत दर्शन व्यवस्थेचा आढावा घेत योग्य त्या सुधारणा करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.
