सोलापूर – वारकरी पंढरीचा, धन्य धन्य जन्म त्याचा जाय नेमें पंढरीशी, चुको नेदी तो वारीसी आषाढी कार्तिकी, सदा नाम गाय मुखी एका जनार्दनी करी वारी, धन्य तोचि बा संसारी संत एकनाथ महाराजांच्या अभंगाप्रमाणे विठ्ठल दर्शनाच्या ओढीने शेगाव येथून निघालेला गजानन महाराजांचा पालखी सोहळा तब्बल ५५० कि.मी. अंतर पायी पार करत शनिवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने सोहळ्याचे स्वागत केले.श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांची पालखी शेगाव येथून २ जून २०२५ रोजी प्रस्थान झाली. ७०० वारकऱ्यांची ही वारी २६ दिवसांचा प्रवास करून जिल्ह्यात दाखल झाली आहे. स्वागतासाठी गावकऱ्यांनी आकर्षक रांगोळी, विद्युत रोषणाई व स्वागत कमानी तयार केल्या होत्या. उळे पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होत्या.
संस्कार भारतीकडून आकर्षक रांगोळी
गावात प्रवेश होणाऱ्या ब्रिजपासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत संस्कार भारती संस्थेच्या वतीने आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.जिल्हा परिषदेच्या वतीने वारकऱ्यांना आराम करण्यासाठी विसाव्याची सोय केली आहे.पायी चालत आलेल्या 3 वारकऱ्यांच्या पायांना आराम मिळावा म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने फूट मसाज मशीनही बसवली आहे.
गावाला जत्रेचे स्वरूप
उळे गावात खाद्यपदार्थ, खेळणी, विविध वस्तू यांसह अनेक दुकाने मोठ्या थाटात मांडण्यात आली होती. एकंदरीत, गावात आनंदाचे वातावरण असून मोठी जत्रा होत असल्याचा अनुभव येत आहे.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी डॉक्टरांची टीम
वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आयुष्मान आरोग्य विभागाच्या वतीने डॉक्टर, नर्स यांच्यासह गोळ्या औषधींची सोय केली आहे.
प्रशासनाकडून स्वागत
श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या पालखीचा जिल्ह्यातील दक्षिण सोलापूरमधील कासेगाव येथे दुपारी ४:४९ वाजता प्रवेश झाला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कुलदीप जंगम यांनी स्वागत केले. यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, समाजकल्याणच्या सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे, उळे ग्रामपंचायतीचे सरपंच अंबिका कोळी, नेताजी खंडागळे आदी अधिकारी उपस्थित होते.
