पंढरपूर – आषाढी यात्रेत वारकऱ्यांना स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. त्याच पद्धतीने पांडुरंगाच्या गोरगरीब भाविकांना निर्मळ पाणीपुरवठा करण्यासाठी पंढरपूर नगर परिषद पाणीपुरवठा प्रशासन सज्ज झाले असल्याचे पाणीपुरवठा अभियंता राजकुमार काळे यांनी सांगितले.आषाढी यात्रेच्या कालावधीत पंढरपुरात किमान १५ लाखांच्या आसपास भाविक असतात. सव्वा लाख लोकांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजनेवर यात्रा कालावधीत १५ लाख लोकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी येते. पंढरपूर शहरास दररोज ३१ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत असतो. मात्र यात्रा कालावधीत रोज ४० ते ४२ एवढा पाणीपुरवठा करण्यात येतो. यामध्ये वाखरी पालखी तळ, ६५ एकर परिसर, अनेक मोकळ्या जागेत उतरणाऱ्या दिंड्यांच्या ठिकाणी, मठ व अन्य ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो वारीकरता जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे ३० जूनपासून कार्यान्वित होणार आहे. तदनंतर शहरातील पाणी नमुने सकाळ-संध्याकाळी तपासले जातील, असे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
भाविकांना पिण्याच्या पाण्यातून कोणतेही आरोग्यविषयक समस्या उत्पन्न होऊ नये, याची काळजी नगर परिषदेकडून घेतली जाते. रोजच्या रोज निर्जर्जंतुकीकरण केले जाते. यात्रेकरिता सुमारे दीडशे पाण्याच्या टँकरद्वारे वारकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येते.
यासाठी अद्ययावत यंत्रणादेखील आवश्यक असून त्यानुसार शासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पुढे येणाऱ्या आषाढी यात्रेपर्यंत पंढरपूरमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचे जलशुद्धीकरण केंद्र तयार होणार असून त्याबाबतचे कामदेखील सुरू आहे. या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये स्काडा, मशिनरी, क्लोरीनेशन, डिक्लोरेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
रोज होतात या तपासण्या
टरबिडीटी, पीएच, फ्री क्लोरीन. क्लोराईड टीडीएस इत्यादी तपासणी केल्या जातात तसेच शहरातील उंच टाक्या जीएसआर व नागरिकांच्या घरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा सोलापूर येथे पाठवले जातात, असे पाणीपुरवठा अभियंता राजकुमार काळे यांनी सांगितले.
