अकलूज – ग्यानबा-तुकारामच्या गजरात श्री संत चौरंगीनाथ महाराज पालखी सोहळा शनिवारी माळीनगर येथे मुक्कामी दाखल झाला. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी माळीनगर वासियांनी गर्दी केली होती. परिणामी माळीनगर परिसर भक्तीमय झाला होता.माळीनगरमध्ये प्रवेश करताना पालखी सोहळ्याचे स्वागत सरपंच अनुपमा एकतपुरे, अनिल एकतपुरे आणि सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या वतीने जनसंपर्क अधिकारी अनिल बनकर यांनी केले. यावेळी परिसरातील वारकरी
आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पालखी सोहळा प्रशालेच्या प्रांगणात विसावल्यानंतर, शुगरकेन सोसायटीचे माजी चेअरमन विजयकुमार नेवसे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी नीता नेवसे यांच्या हस्ते पादुकांचे पूजन केले. या प्रसंगी माळी शुगरचे संचालक राहुल गिरमे, राजीव देवकर, माजी प्राचार्य प्रकाश चौरे, अनिल जाधव, शब्बीर शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.माळीनगर ग्रामपंचायत, दि सासवड माळी शुगर फॅक्टरी यांच्यासह परिसरातील विविध संस्था आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत केले माळीनगर येथील मॉडेल हायस्कूलच्या मैदानावर अश्वाचे गोल रिंगण मोठ्या जल्लोषात पार पडले. माळी शुगर यांच्या वतीने माळीनगर येथे रात्री पालखीचा मुक्काम आणि भोजन व पाण्याची व्यवस्था केली होती.
